औरंगाबाद : शिवरायांच्या पुतळ्याचे काम रखडले, कंत्राटदार गायब

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 नोव्हेंबर 2019

 पुतळा उभारणीसाठी नव्या एजन्सीचा शोध 

औरंगाबाद - क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची उंची वाढविण्याचे काम महापालिकेने चार महिन्यांपूर्वी सुरू केले होते. पुतळा स्थलांतरित करून खोदकाम केल्यानंतर कंत्राटदार गायब झाला असून, यापूर्वीदेखील याच कंत्राटदाराने काम करण्याची तयारी नसल्याचे महापालिकेला सांगितले होते. त्यामुळे वारंवार त्रास देणाऱ्या या कंत्राटदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करून नव्या कंत्राटदारामार्फत काम करून घेण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. 

क्रांती चौकातील शिवरायांच्या पुतळ्याची उंची वाढविण्याचे काम महापालिकेने गायत्री आर्किटेक्‍टला एक कोटी 84 लाख 53 हजार 572 रुपयांत दिले आहे; मात्र कार्यारंभ आदेश देऊनही कंत्राटदाराने हे काम सुरू केले नाही. त्यामुळे त्रस्त झालेल्या महापालिका अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराला नोटीस बजावत गुन्हे दाखल करण्याची तंबी दिली. त्यानंतर जुलै महिन्यात कंत्राटदाराने काम सुरू केले व शिवरायांचा पुतळा स्थलांतरित करण्यात आला. कंत्राटदाराने पुतळा स्थलांतरित केल्यानंतर या ठिकाणी खड्डा खोदत बेसमेंटचे काम पूर्ण केले. त्यानंतर तो फिरकलाच नाही. सोमवारी (ता. चार) महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर विजय औताडे, सभापती जयश्री कुलकर्णी यांनी कामाची पाहणी केली होती. तेव्हा कंत्राटदार काम करण्यासाठी समोर येत नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. वारंवार फोन केल्यानंतरही कंत्राटदार प्रतिसाद देत नसल्यामुळे महापालिका पुन्हा एकदा अडचणीत सापडली आहे. त्यामुळे आता हे काम वेळेत पूर्ण करून घेण्यासाठी नेमके काय करता येईल, सध्या काम करणाऱ्या कंत्राटदाराकडून काम पूर्ण करून घ्यायचे की दुसऱ्या कंत्राटदाराची नियुक्ती करायची, याचा निर्णय दोन दिवसांत घेतला जाईल, असे महापौरांनी सांगितले होते. त्यानुसार कंत्राटदारावर गुन्हा दाखल करून नव्या कंत्राटदारामार्फत काम करून घेण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. 
  
पुतळ्याचे काम रखडणार 
क्रांती चौकातील पुतळा मडिलगेकर आर्ट गॅलरीत हलविण्यात आला आहे. या ठिकाणी 21 फूट उंचीचा नवा पुतळा बसविण्यात येणार आहे. त्यानुसार प्रशासनाने प्रस्तावही तयार केला आहे; मात्र चबुतरा उभारणीचेच काम रखडल्यामुळे पुतळा उभारणीचे कामही रखडण्याची शक्‍यता आहे. 
 

शिवजयंतीपूर्वी शिवरायांचा अश्‍वारूढ पुतळा उभारा 
क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची उंची वाढविण्याचे काम ठप्प पडले आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी शिवप्रेमींतर्फे केली जात आहे. कामास गती देऊन शिवजयंतीपूर्वी हे काम पूर्ण करावे, या मागणीचे निवेदन सोमवारी (ता. 11) दुपारी चार वाजता मराठा क्रांती मोर्चासह शिवप्रेमी नागरिकांतर्फे महापालिकेस देण्यात येणार आहे. 

क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळाच्या दोन्ही बाजूंनी उड्डाणपूल आहे. त्यामुळे या ठिकाणी असलेल्या वास्तूची उंची वाढवावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सातत्याने करण्यात आली होती. त्याची दखल घेत महापालिका प्रशासनाने या पुतळ्याची उंची वाढविण्याचे काम हाती घेतले; परंतु कंत्राटदार काम करण्यास तयार नसल्याने हे काम रखडले आहे. शिवजयंतीपूर्वी हे काम पूर्ण करावे, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chhatrapati Shivaji Maharaj statue in Kranti Chowk Aurangabad