Maratha Kranti Morcha: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छावाच्या कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न

तानाजी जाधवर
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

अचानक आलेल्या कार्यकर्त्यांनी थेट अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांना या अगोदरच पुर्वकल्पना दिली असल्याने पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे या कार्यकर्त्यांना तातडीने ताब्यात घेतले.

उस्मानाबाद - मराठा आरक्षणासह विविध मागण्यांकरीता छावा संघटनेच्या सहा कार्यकर्त्यांनी सामुहीकपणे आत्मदहन करण्याचा सोमवारी (ता. 20) प्रयत्न केला. त्याठिकाणी पोलिसांनी हस्तक्षेप करीत कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन आनंदनगर पोलिस ठाण्यामध्ये नेण्यात आले.

दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास जोरदार घोषणाबाजी करुन शिवाजी चौक छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दणाणुन सोडला. अचानक आलेल्या कार्यकर्त्यांनी थेट अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांना या अगोदरच पुर्वकल्पना दिली असल्याने पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे या कार्यकर्त्यांना तातडीने ताब्यात घेतले. 13 ऑगस्टला या संघटनेकडून जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते. मराठा आरक्षणासह विविध मागण्याकरीता राज्यभरात 58 मुकमोर्चे काढून मराठा समाजाने शासनास मागण्या कळविल्या होत्या.

मात्र सरकारने समाजाच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, या विरोधात संघटनेकडून 10 ऑगस्टला तेरणा धरणात जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र 9 ऑगस्ट महाराष्ट्र बंद पुकारल्याने पोलिस प्रशासनावर ताण येऊ शकतो तेव्हा मेगा भरती स्थिगिती दिल्याचे कारणाने ते आंदोलन स्थगित करण्यात आले होते. अद्यापही शासनाने मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तसेच शासनाने मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य करुन मराठा आंदोलकावर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी करण्यात आली होती.

अन्यथा शिवाजी महाराज चौकामध्ये 20 ऑगस्टला आत्मदहन करणार असल्याचा इशारा 13 ऑगस्टला दिलेल्या निवेदनाद्वारे छावा संघटनेने दिला होता. त्यानुसार आज संघटनेच्या कार्यकर्त्यानी सामुहीकपणे आत्मदहनाचा प्रयत्न केला. आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्यांमध्ये मराठवाडा अध्यक्ष विष्णु कोळी, जिल्हाध्यक्ष काकासाहेब राऊत, जिल्हा कार्याध्यक्ष अमरभाई शेख, जिल्हा उपाध्यक्ष अनिल माने, शशिकांत पाटील, आकाश जेधे यांचा समावेश होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chhva volunteers attempt suicide for demand of Maratha reservation