esakal | मुख्यमंत्र्यांनी केली खासदार संजय जाधव यांची नाराजी दूर, मुंबईत बैठक 
sakal

बोलून बातमी शोधा

jadhav

जिंतूर बाजार समितीच्या अशासकीय प्रशासक निवडीवरून नाराज झालेले परभणीचे शिवसेनेचे खासदार यांनी गुरुवारी (ता.२७) मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची सायंकाळी भेट घेतली. या भेटी दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी जिंतूर प्रकरणी योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन खासदार संजय जाधव यांना दिले आहे.

मुख्यमंत्र्यांनी केली खासदार संजय जाधव यांची नाराजी दूर, मुंबईत बैठक 

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी ः जिंतूर बाजार समितीच्या अशासकीय प्रशासक निवडीवरून नाराज झालेले परभणीचे शिवसेनेचे खासदार यांनी गुरुवारी (ता.२७) मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची सायंकाळी भेट घेतली. या भेटी दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी जिंतूर प्रकरणी योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन खासदार संजय जाधव यांना दिले आहे.
 
जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर अशासकीय प्रशासक म्हणून राष्ट्रवादी कॉँग्रेसचे श्री. थिटे यांची निवड करण्यात आली आहे. परंतू, या पदावर सहा महिण्यासाठी स्थानिक शिवसैनिकांना संधी द्यावी अशी खासदार संजय जाधव यांची मागणी होती. परंतू, मंगळवारी (ता.२५) या पदावर निवड घोषित झाल्याने खासदार संजय जाधव नाराज झाले होते. त्यानंतर त्यांनी थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे नाराजी व्यक्त करीत राजीनामा पाठविला होता. 

हेही वाचा - २१४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची प्रकृती गंभीर, गुरुवारी नऊ जणांचा मृत्यू, १४८ जण बाधित; १५४ रुग्ण कोरोना मुक्त

संपूर्ण घडामोड मुख्यमंत्र्यासमोर मांडली
या संदर्भात गुरुवारी सायंकाळी खासदार संजय जाधव यांची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीस शिवसेना नेते एकनाथ शिंदे, मंत्री अदित्य ठाकरे, मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. या बैठकीत खासदार संजय जाधव यांनी जिंतूर बाजार समितीची संपूर्ण घडामोड मुख्यमंत्र्यासमोर मांडली. त्यामुळे या प्रकरणात निश्चित सकारात्मक निर्णय देऊ असे मुख्यमंत्र्यांनी खासदार संजय जाधव यांना आश्वासित केले आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय प्रवेशाचा ७० : ३० फॉर्मुला रद्द करणे या विषयावर देखील चर्चा झाली. तब्बल २० मिनिटे ही बैठक चालली. या बैठकीतून खासदार संजय जाधव यांची नाराजी दुर करण्यात आली. जिंतूरच्या बाबतीत योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन या वेळी खासदार जाधव यांना देण्यात आल्याचे समजते.  

हेही वाचा - परभणी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक

दगडफेकप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल 
परभणी ः राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या कार्यालयावर बुधवारी (ता.२६) रात्री उशिरा दगडफेक करण्यात आली. त्याप्रकरणी नवामोंढा पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. या तक्रारीवरून चौघा अज्ञात युवकांविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 
खासदार संजय जाधव यांच्या राजीनाम्यानंतर जिल्ह्यात राजकीय घडामोडीला वेग आला आहे. राजीनाम्यानंतर शहरातील वसमत रस्त्यावर असलेल्या राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या जिल्हा कार्यालयावर अज्ञात चार युवकांनी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास दगडफेक केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे परभणी तालुकाध्यक्ष संतोष देशमुख यांनी बुधवारी (ता.२६) रात्री नवामोंढा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यात चौघेजण मोटारसायकलवर येत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस भवनवर दगडफेक केली. दगडफेकीत खिडकीचे, भिंतीवर लावलेले काचा फुटल्या. दगडफेकीनंतर आलेल्या चौघांनी घोषणाबाजी केली. त्यावेळी जवळच उभे असलेले सुमंत वाघ व सिद्धांत हाके हे आवाजाच्या दिशेने आले. मात्र, तोपर्यंत आलेले चौघेहीजण खानापूरफाट्याकडे पळून गेल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. नवामोंढा पोलिसांनी तक्रारीवरून तीन अज्ञात युवकांवर गुन्ह्याची नोंद केली आहे. तपास फौजदार सुनील पल्लेवाडे हे करीत आहेत.

संपादन ः राजन मंगरुळकर