
आष्टी तालुक्यातील सुरुडी येथे तरुण शेतकऱ्याचा बळी घेतल्यानंतर सुरुडीपासून जवळच असलेल्या किन्ही (काकडेची) येथे बिबट्याने दुसरा बळी घेतला आहे.
आष्टी (जि.बीड) : आष्टी तालुक्यातील सुरुडी येथे तरुण शेतकऱ्याचा बळी घेतल्यानंतर सुरुडीपासून जवळच असलेल्या किन्ही (काकडेची) येथे बिबट्याने दुसरा बळी घेतला आहे. शुक्रवारी (ता.२७) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास बिबट्याने शेतातील विहिरीवर पाणी देण्यासाठी गेलेल्या दहा वर्षीय स्वराज ऊर्फ यश सुनील भापकर या बालकावर झेप घालून उचलून नेले. काही वेळात परिसरात या बालकाचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला. या घटनेने परिसरात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आष्टी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा उच्छाद सुरू आहे. मोराळा पंचायत समिती गणाच्या सदस्या आशा गर्जे यांचे पती नागनाथ गर्जे यांना बिबट्याने मंगळवारी भरदिवसा शेतात हल्ला करून ठार केले. शेतात तुरीला पाणी घालत असताना ही घटना घडली. या घटनेला दोन दिवस उलटत नाहीत, तोच आज शुक्रवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. स्वराज हा मूळचा खराटवाडी (ता. श्रीगोंदा, जि. नगर) येथील रहिवासी असून तो दिवाळीनिमित्त आजोळी आजीकडे आला होता. शुक्रवारी तो मावशीच्या पतीबरोबर (काका) तो शेतातील तुरीच्या पिकाला पाणी देण्यासाठीची विहिरीवरील मोटार चालू करण्यासाठी गेला होता. या वेळी तुरीच्या पिकातून आलेल्या बिबट्याने झेप घेत काकासमोर स्वराजला मानेला पकडून उचलून नेले. काकाने आरडाओरडा केला. त्यानंतर शोधाशोध केली असता जवळच्याच डोंगराळ भागात स्वराजचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला.
तातडीने बंदोबस्त करा
आष्टी तालुक्याला लागून असलेल्या पाथर्डी (जि.नगर) येथील केळवंडी, मढी व शिरापूर या तीन गावांत बिबट्याने आठवडाभराच्या अंतराने तीन बालकांना पालकांसमोर उचलून नेत ठार केले होते. त्यानंतर वन विभागाने येथे विशेष मोहीम राबवून तीन बिबटे जेरबंद केले. त्यातील एक मादी बिबट्या तालुक्यातील सावरगाव (मायंबा) परिसरातील पिंजऱ्यांत अडकला. आता नरभक्षक बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाने पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.
आजोळी आला मृत्यू
स्वराज भापकर हा श्रीगोंदा तालुक्यातील रहिवासी असून, तो आजोळी काकडेची किन्ही येथे दिवाळीनिमित्त आलेला होता. स्वराजचे वडील शेतकरी आहेत. आई-वडिलांचा तो एकुलता एक मुलगा होता. मावशीच्या पतीबरोबर (काका) तो शेतात आला होता. मोटार चालू करताना अचानक तुरीच्या पिकातून झेप घेत बिबट्याने त्याला काकासमोर उचलून नेले. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
दहशतीत अधिकच भर
दरम्यान, बिबट्याने शेतकऱ्याला ठार केलेल्या सुरुडी या गावापासून काकडेची किन्ही हे गाव सात ते आठ किलोमीटर अंतरावर आहे. आष्टी तालुक्याच्या डोंगरपट्ट्यातील ही गावे असून, तीन दिवसांत बिबट्याने दोन बळी घेतल्याने परिसरातील गावांसह तालुक्यात दहशत पसरली आहे. गुरुवारी (ता. २६) आष्टी शहराजवळ तसेच धानोरा, वाघळूज भागात तसेच आजही (ता. २७) शहरानजीक वारंगुळेवस्तीवर बिबट्या दिसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.
संपादन - गणेश पिटेकर