आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलांची स्वंयरोजगारातून समृध्दीकडे वाटचाल

Parbhani News
Parbhani News

परभणी : शेतकरी कुटूंबातील कर्त्या व्यक्तीने आत्महत्या केल्यानंतर त्यांचे कुटूंब उध्वस्त होऊन जाते. घरातील प्रत्येकासमोर हजारो वाटा असतात, परंतु मार्ग सापडत नाही. संपूर्ण घर कोलमडून जाते. शेतीकडे जावे तर भाळी गोंदलेली नापिकी दृष्टीस पडते, दुसरा कोणता व्यवसाय करावा तर घरातील दारिद्र्य साथ सोडत नाही. अश्या विदारक परिस्थितीतून राज्यातील हजारो कुटूंब आज मार्गक्रमण करत आहेत. परंतु, या विपरित परिस्थितीतूनही मार्ग काढत स्वताः सह कुटूंबाचाही आधार बननारेच आयुष्यात यशस्वी होतात.

वडिलांनी कर्जबाजारी व नापिकीमुळे आत्महत्या केल्यानंतर खचलेल्या आईचा व उध्दवस्त कुटूंबाचा आधार बनत जांब (ता. परभणी) या गावातील दोन विशीतील युवकांनी परभणीत हॉटेलचा व्यवसाय सुरू करून इतरांपुढे आदर्श निर्माण केला आहे.

परभणी तालुक्यातील जांब (रेंगे) हे गाव पुढाऱ्यांचे गाव म्हणून ओळखले जाते. राजकारणाचा पिढीजात वारसा या गावाला लाभला. त्यामुळेच परभणी जिल्ह्यात या गावाचा पुढारलेले गाव असा नावलौकीक आहे. परंतु, शेतकरी आत्महत्येच्या शापातून हे गाव देखील सुटले नाही. ऑक्टोबर महिण्यात या गावातील दत्तराव विश्वांभरे या शेतकऱ्याने विहिरीत उडी घेवून जीवनयात्रा संपवली. डोक्यावर झालेला कर्जाचा डोंगर व शेतीतील सततची नापिकी यामुळे दत्तराव विश्वांभरे या शेतकऱ्याने आत्महत्येचा मार्ग स्विकारला. दत्तराव यांनी आत्महत्या करून स्वतःची सुटका तर करून घेतली. परंतु, त्यांच्या भरोश्यावर असणारी पत्नी मंगलाताई व गंगाप्रसाद, मनोज आणि आकाश या तीन मुलांचे पुढे काय ? हा विचार त्यांनी केलाच नाही. वडीलांनी आत्महत्या केल्यानंतर कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. १८ ते २२ वर्ष वयोगटातील तिन्ही मुले उघडी पडली. 

शेतीसह हॉटेल व्यवसायाचा घेतला निर्णय
शेती आता या मुलांसाठी उदरनिर्वाहाचा प्रमुख मार्ग होती. परंतु, तिची नापिकी हा प्रश्न पुन्हा समोर आला. या परिस्थिती खचून न जाता शेतीसोबतच काही तरी व्यवसाय करण्याचा निर्णय मनोज व आकाश या दोन भावंडानी घेतला. वडिलांच्या निधनाचे दुःख बाजूला सारून त्यांनी परभणीतील वसमत रस्त्यावर चटका चायनीज नावाचा हॉटेल व्यवसाय सुरू केला आहे. आकाश याने हॉटेल मॅनेजमेंटचा डिप्लोमा केलेला असल्याने त्याला या व्यवसायची चांगली माहिती होती. 

पुन्हा काढले कर्ज; पण लागले सार्थकी
व्यवसाय उभा करण्यासाठी पुन्हा कर्ज काढण्याची वेळ या युवकांवर आली. परंतु, तेथे ही न डगमगता त्यांनी हा व्यवसाय सुरू केला. अवघ्या दोन महिण्यात घेतलेले कर्ज जवळपास फेडून हा व्यवसाय वाढविला आहे. या व्यवसायामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारत आहे. मोठा गंगाप्रसाद हा शेती पाहतो तर मनोज व आकाश यांनी व्यवसायात लक्ष केंद्रीत केले आहे. शेतकरी असलेल्या वडीलांच्या आत्महत्येचे दुःख बाजूला सारून या युवकांनी उचललेले पाऊल हे इतरांसाठी प्रेरणादायीच म्हणावे लागले.

निश्चित बदल घडतो
वडीलांच्या निधनानंतर आमच्यासमोर सर्वात मोठा प्रश्न होता तो, पैश्याचा दररोजचे घर चालवणे खचलेल्या आईला आधार देणे. त्यामुळे सर्व बाजूला ठेवून आम्ही हा व्यवसाय उभारला आहे. शेतकऱ्यांच्या मुलांनी शेतीसोबत एखादा व्यवसाय उभा केला, तर तो निश्चितच बदल घडवितो हा आमचा अनुभव आहे. 
- आकाश दत्तराव विश्वांभरे, तरूण व्यवासायिक.   

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com