चिमुकल्याने वाढदिवसाचे पैसे दिले मुख्यमंत्री सहायता निधीला

जगन्नाथ पुरी
बुधवार, 1 एप्रिल 2020

गल्यात जमविलेले पैसे निलहर्षच्या कुटुंबीयांनी मोजले असता गल्यात दोन हजार ७०० रुपये निघाले. तहसीलदार जीवककुमार कांबळे यांची तहसील कार्यालयात जाऊन भेट घेतली. या वेळी निलहर्षने वाढदिवसाठी जमविलेले पैसे तहसीलदार श्री. कांबळे यांच्या स्वाधीन केले. 

सेनगाव (जि. हिंगोली) : शहरातील साडेचार वर्षांच्या निलहर्षने वाढदिवसासाठी जमविलेले २७०० रुपये कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्यासाठी मंगळवारी (ता. ३१) तहसीलदार जीवनकुमार कांबळे यांच्याकडे सुपूर्द केले आहेत.

शहरातील युवा सेना उपजिल्हाप्रमुख अनिल अगस्ती यांच्या साडेचार वर्षांचा निलहर्ष याचा पुढच्या महिन्यात वाढदिवस आहे. मागील एक वर्षांपासून चिमुकल्या निलहर्षने आई- वडील व आजोबाकडून मिळालेले पैसे एका गल्यात जमा करून ठेवले. वाढदिवसाच्या दिवशी विविध वस्तू खरेदी करण्यासाठी मिळालेले पैसे तो नियमित गल्यात टाकत होता. घरच्या सदस्यांसोबत निलहर्ष आवडीने टीव्ही पाहतो. 

हेही वाचापोलिसांच्या मदतीला ‘राकाँ’चे पदाधिकारी धावले

विषाणुजन्य आजाराचे थैमान

शिवाय वडिलांच्या मोबाइलवरील सोशल मीडियातून कोरोना विषाणुजन्य आजाराने थैमान घातल्याचे त्याला समजले. लॉकडाउनमुळे ज्येष्ठ मंडळी टीव्हीवर कोरोना आजाराच्या ताज्या घडामोडी पाहण्यात मग्न आहेत. या वेळी गरजू रुग्णांना विविध क्षेत्रांतील सामाजिक कार्यकर्ते मदत करीत आहेत. या स्वरुपाच्या बातम्या पाहून निलहर्ष प्रभावित झाला. तो वेळोवेळी घरच्यांना कोरोना काय आहे, यावर इलाज नाही का, आजारी लोकांना मदत का केली जाते, यासह असंख्य प्रश्न विचारत होता.

गल्यात जमा होते दोन हजार ७०० रुपये 

 त्याने उत्सुकतेने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली जायची. सोमवारी सकाळी निलहर्ष उठला त्याने पैसे जमविलेला गल्ला घेत वडिलांकडे दिला व यात जमा झालेले पैसे कोरोना आजारी लोकांसाठी द्यायचे, असा आग्रह केला. गल्यात जमविलेले पैसे निलहर्षच्या कुटुंबीयांनी मोजले असता गल्यात दोन हजार ७०० रुपये निघाले. तहसीलदार जीवककुमार कांबळे यांची तहसील कार्यालयात जाऊन भेट घेतली. या वेळी निलहर्षने वाढदिवसाठी जमविलेले पैसे तहसीलदार श्री. कांबळे यांच्या स्वाधीन केले. 

मदत करण्याचे आवाहन

या वेळी निलहर्षचे वडील अनिल अगस्ती, आजोबा केशव अगस्ती, सामाजिक कार्यकर्ते शैलेश तोष्णीवाल, अप्पर तहसीलदार वैजनाथ भालेराव उपस्थित होते. निलहर्ष याच्या मदतीचे सर्वस्तरातून स्वागत केले जात आहे. कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी सर्वांनी पुढाकार घेवून जमेल तशी मदत करण्याची गरज असून सर्वांनी मदत करावी, असे आवाहन केले जात आहे. 

येथे क्लिक कराआम्हाला आमच्या गावी जाऊ द्या; मजुरांचा आर्त टाहो

 

पुढच्या महिन्यात वाढदिवस

निलहर्षचा पुढच्या महिन्यात वाढदिवस आहे. त्यासाठी तो घरच्याकडून मिळालेले पैसे एका गल्यात जमावित होता. रुग्णांच्या मदतीच्या बातम्या पाहून तो प्रभावित झाला. आपणही मदत करावी, हा अट्टाहास धरला. मुख्यमंत्री सहायता निधीत २७०० रुपये जमा केले. या छोट्याशा चिमुकल्याच्या विधायक विचाराने आमच्या कुटुंबाला आंनद झाला आहे.
-अनिल अगस्ती


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chimukla gave birthday money to the Chief Minister's Aid Fund Hingoli news