नागरिकांना भाजीपाल्यापासून रहावे लागते वंचित

राजाभाऊ नगरकर
Saturday, 28 March 2020

जिंतूर शहरातील येलदरी रोडवर छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नृसिंह चौक दरम्यान, आणि जिल्हा परिषद प्रशालेच्या मैदानावर भाजीमंडई भरवण्यात आली. परंतु शहराच्या पूर्व भागातील लहुजीनगर, श्रीराम मंदिर, साबळे गल्ली, साठेनगर, बेलदार नगर, कुरेशी मोहल्ला, राज मोहल्ला, चर्मकार वस्ती शया भागापासून दोन्ही मंडई लांब असल्याने जाण्या-येण्यास, खरेदीसाठी लागणाऱ्या वेळेमुळे या भागातील नागरिकांना दैनंदिनच्या भाजीपाल्यापासून वंचित रहावे लागत आहे. 

जिंतूर (जि.परभणी) : नगर परिषदेच्या वतीने शुक्रवारी (ता.२७) दोन ठिकाणी भाजी विक्रेत्यांसाठी जागा उपलब्ध करुन दिली तरी, शहरापासून या भाजीमंडई लांब आहेत. त्यामुळे शहराच्या पूर्व भागातील नारिकांना भाजीपाल्यापासून वंचित रहावे लागत आहे. 

लाॅकडाऊनमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी होणाऱ्या गर्दीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण न होता त्यांना सुलभतेने जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य खरेदी करता यावे. शिवाय वेळेच्या बंधनामुळे फळे, भाजीपाला खरेदीसाठी भाजीमंडईत उडत असलेली झुंबड कमी करण्यासाठी स्थानिक महसूल, पोलिस व नगरपरिषद प्रशासनातर्फे शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार शुक्रवार (ता.२७) पासून दोन ठिकाणी भाजी विक्रेत्यांसाठी जागा उपलब्ध करून दिली. त्यानुसार जिंतूर शहरातील येलदरी रोडवर छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नृसिंह चौक दरम्यान, आणि जिल्हा परिषद प्रशालेच्या मैदानावर भाजीमंडई भरवण्यात आली. परंतु शहराच्या पूर्व भागातील लहुजीनगर, श्रीराम मंदिर, साबळे गल्ली, साठेनगर, बेलदार नगर, कुरेशी मोहल्ला, राज मोहल्ला, चर्मकार वस्ती शया भागापासून दोन्ही मंडई लांब असल्याने जाण्या-येण्यास, खरेदीसाठी लागणाऱ्या वेळेमुळे या भागातील नागरिकांना दैनंदिनच्या भाजीपाल्यापासून वंचित रहावे लागत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन नगरपालिकेच्या परिसरात भाजी मंडईची व्यवस्था केल्यास वंचितांना दिलासा मिळू शकेल.

हेही वाचा - नागरिकांच्या आरोग्यासाठी नगरसेवक सरसावले

व्यावसायिकांकडून आदेशाची पायमल्ली
 किराणा व भाजीपाला खरेदी करण्यासाठी प्रशासनाने दोन ग्राहकांमध्ये एक मीटरचे अंतर राखूनच खरेदी करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु, पैशाच्या हव्यासापायी भाजीपाला व किराणा व्यवसायिकांनी या आदेशाला केराची टोपली दाखवल्याने चित्र जिंतूर शहरात ठिकठिकाणी दिसले. याकडे संबंधितांनी ही गांभीर्याने लक्ष दिले नाही. त्यामुळे शहरात संचारबंदी आहे की नाही आहे अशी परिस्थिती तीन तास पाहायला मिळाली. एकीकडे ‘कोरोना’च्या संसर्गजन्य विषाणूला रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासन सातत्याने प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करत असताना नागरिक व व्यापाऱ्यांनी ठरवून दिलेल्या नियमांची कुठल्याही प्रकारची सुरक्षा व काळजी घेतलेली दिसत नाही.
 
किराणा बाजारात अचानक भाव वाढ...
संचारबंदीमुळे प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेत किराणा सामान खरेदी करण्यासाठी नागरिक घराबाहेर पडत आहेत.किराणा व्यवसायिक या संधीचा फायदा घेत प्रति किलो दहा ते पंधरा रुपये चढ्याभावाप्रमाणे विक्री करत असल्याबद्दल ग्राहकांच्या तक्रारी आहेत.परंतु पुढे होऊन कोणी प्रशासनास तक्रार देत नाही.त्यामुळे या अचानक भाववाढीने ग्राहकांची पिळवणूक होत आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Citizens have to stay away from vegetable deprivation