कळमनुरीत खाद्य तेलासाठी नागरिकांची धावपळ

संजय कापसे
बुधवार, 25 मार्च 2020

परिसरातील खाद्यतेल उत्पादक कंपन्यांनी ३१ मार्चपर्यंत आपले उत्पादन थांबविले आहे. त्यामुळे सोयाबीन तेलाची आवक काही प्रमाणात कमी झाली आहे. किराणा दुकानादाराकडे उपलब्ध असलेले सोयाबीन तेलाची विक्री करावी लागत आहे.

कळमनुरी (जि. हिंगोली) : कोरोना विषाणूजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून आगामी एकवीस दिवस जमावबंदीचा आदेश दिल्यानंतर नागरिकांनी जीवनावश्यक वस्तूची खरेदी करण्याकरिता भाजी मंडी, औषधी दुकाने व किराणा दुकानांमधून गर्दी केली आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर परिसरातील खाद्य तेल उत्पादक कंपन्यांनी उत्पादन थांबवल्यामुळे किराणा दुकानदारानांही मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नसल्यामुळे अडचणी निर्माण झाल्याचे चित्र समोर आले आहे.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने आता कडक पावले उचलली आहेत. जमावबंदी आदेशाचे उल्लंघन होणार नाही याकरिता ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. मात्र जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना शिस्त लावण्याची वेळ आली आहे. किराणा दुकान, भाजी मंडीकरिता प्रशासनाने नियमावली घालून दिली असून एक दिवस आड ठराविक ठिकाणी पालेभाज्या विक्रीसाठी जागा नेमून देण्यासंदर्भात पालिका प्रशासनाने तयारी चालवली आहे.

हेही वाचाहिंगोलीत एक दिवसाआड भाजीपाला आणि किराणा- जिल्हाधिकारी

दुकान दोन तास सुरू ठेवण्याच्या सूचना

दुसऱ्या बाजुला किराणा दुकान एक दिवस आड तेही दोन तास सुरू ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक ग्राहकाला सुरक्षीत अंतरावर उभे राहून खरेदी करावी लागत आहे. यातून ग्राहक गर्दी करत आहेत. त्यामुळे ग्राहकांना शिस्त लावण्याकरिता पुढील काळात किराणा दुकानाच्या बाहेरही पोलिस कर्मचाऱ्यांची किंवा गृहरक्षक दल जवानांची नियुक्ती करणे गरजेचे झाले आहे. 

खरेदी करण्यावर भर 

कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून पुढील एकवीस दिवस जमावबंदी राहण्याचे जाहीर झाल्यानंतर नागरिकांनी रात्री उशिरा जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीकरिता किराणा दुकान, औषधी दुकान व भाजीमंडीमधून खरेदी करण्याकरता गर्दी केली. बहुतांश नागरिकांनी पुढील पंधरा दिवस पुरेल एवढे साहित्य खरेदी करण्यावर भर दिला. किराणा दुकानांमधून मोठ्या प्रमाणावर खाद्य तेलाची मागणी वाढली आहे.

खाद्यतेल उत्पादक कंपन्यांनी उत्पादन थांबविले

 ग्राहकांना व किरकोळ विक्रेत्यांना ठराविक प्रमाणात खाद्यतेल देण्यात येत असल्याचे चित्र आहे. जमावबंदी व आजाराची पार्श्वभूमी पाहता हिंगोली, हदगाव, नांदेड परिसरातील खाद्यतेल उत्पादक कंपन्यांनी ३१ मार्चपर्यंत आपले उत्पादन थांबविले आहे. त्यामुळे सोयाबीन तेलाची आवक काही प्रमाणात कमी झाली आहे. किराणा दुकानादाराकडे उपलब्ध असलेले सोयाबीन तेलाची विक्री करावी लागत आहे. त्यामुळे ग्राहक व किरकोळ विक्रेत्यांना मागणीच्या तुलनेत खाद्यतेल उपलब्ध होत नसल्याचे सांगण्यात आले आहे. 

येथे क्लिक करा हिंगोली जिल्‍ह्यात मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस

हिंगोलीत दिवसाआड मिळणार पालेभाज्या

हिंगोली :  जिल्‍ह्यात कोरोना विषाणुंच्या पार्श्वभूमीवर पालेभाज्या, किराणा सामान खरेदी करण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत. यामुळे कोरोनाचा प्रादूर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्याच्या संपूर्ण भागात आता एक दिवसाआड पालेभाज्या, किराणा सामान मिळणार आहे. तसे आदेश जिल्‍हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी काढले आहेत. 

ओळखपत्र जवळ बाळगणे बंधनकारक

हिंगोली शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या भाजीमंडईत पालेभाज्या विक्रीस मनाई करण्यात आली आहे. शहरातील कोथळज रोड, फंक्‍शन हॉल, जलेश्वर मंदिर, रिसाला बाजार, इदगाह मैदान, पोळा मारोती मंदिर, सिद्धार्थनगर, केमिस्‍ट भवन या आठ ठिकाणीच पालेभाज्यांची विक्री करावी लागणार आहे. तसेच पालिकेने दिलेले ओळखपत्र विक्रेत्यांनी जवळ बाळगणे बंधनकारक असल्याचे नगरपरिषदचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Citizens' rush for edible oils