esakal | हिंगोली जिल्‍ह्यात मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस

बोलून बातमी शोधा

kendra buduruk

जिल्‍ह्यात मंगळवारी (ता.२४) सायंकाळी पाच ते सहा वााजेच्या सुमारास हिंगोली शहरासह सेनगाव, कळमुनरी तालुक्‍यातील काही गावात अवकाळी पाऊस झाला. मागच्या आठवड्यातही बुधवार व गुरुवारी (ता.१९) सलग दोन दिवस गारपीट झाल्याने गहू, हरभरा पिकांचे अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले

हिंगोली जिल्‍ह्यात मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस
sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : जिल्‍ह्यात मंगळवारी (ता.२४) सायंकाळी पाच ते सहा वााजेच्या सुमारास हिंगोली शहरासह सेनगाव, कळमुनरी तालुक्‍यातील काही गावात अवकाळी पाऊस झाला. या पावसाने गहू, हरभरा, हळद पिकास फटका बसला असल्याचे शेतकरी सांगत आहेत. पावसामुळे सायंकाळी शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ वाढली होती.

जिल्‍ह्यात सकाळपासून वातावरणात बदल होण्यास सुरवात झाली. काही भागात ढगाळ वातावरण होते. सायंकाळी पाचच्या सुमारास हिंगोलीसह तालुक्‍यातील सिरसम बुद्रुक, बासंबा, अंधारवाडी, खांबाळा, भांडेगाव, साटंबा, पांगरी, फाळेगाव, कनेरगावनाका, वांझोळा आदी भागात पाऊस झाला. सेनगाव तालुक्‍यातील केंद्रा बुद्रुक, बटवाडी, कहाकर, गोरेगाव, कळमनुरी तालुक्‍यातील आखाडा बाळापूर, डोंगरगाव, येलकी, शेवाळा आदी भागात पाऊस झाला. तर औंढा नागनाथ तालुक्‍यातील गोळेगाव, गोजेगाव, साळणा, येळी, केळी या भागात सायंकाळी आभाळ दाटून आले होते. 

हेही वाचाघरी रहा, सुरक्षीत राहा, प्रशासनाला सहकार्य करा : आमदार संतोष बांगर

पिकांचे मोठे नुकसान

हवा देखील सुटली होती. दरम्‍यान, काढणीस आलेल्या व शेतात उभ्या असलेल्या गहू, ज्‍वारी, हरभरा व हळद पिकांचे मोठे नुकसान पावसामुळे झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. सध्या कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे शेतातील कामे करण्यास मजूर येत नसल्याने शेतात गव्हाचे पीक उभे आहे. हळद काढणीस देखील कोणी मजूर येत नसल्याने शेतकरी अडचणीत आहेत.
त्‍यातच वातावरणात होत असलेला बदल व पडत असलेल्या पावसाने पिकांना फटका बसत आहे. 

मागील आठवड्यात गारपीट

सायंकाळी शहरासह जिल्‍ह्यातील अनेक भागात ढगाळ वातावरण कायम होते. दरम्यान, मागच्या आठवड्यात बुधवार व गुरुवारी (ता.१९) सलग दोन दिवस गारपीट झाल्याने गहू, हरभरा पिकांचे अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले. केळी, संत्र्याच्या बागासह आंब्याला आलेला मोहर गळून पडल्याने शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्याने तोंडापूर येथे अनेकाच्या घरावरील टिनपत्रे देखील उडाली होती. 

येथे क्लिक कराकोरोना : संशयितावर ‘व्हीआरआरटी’ पथक ठेवणार लक्ष

शेतकरी अडचणीत सापडले

या पावसाने शेतात कापणी केलेल्या गव्हाचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले होते. ही कसर रब्बी हंगामात भरून निघेल, अशी अपेक्षा होती. त्‍याप्रमाणे रब्‍बीचे क्षेत्र देखील वाढले होते. मात्र पीक काढणीच्या वेळी वातावरणात होत असलेला बदल पाहता खरीपाबरोबर रब्‍बीचे देखील नुकसान होत असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. काही शेतकऱ्याच्या गहू व हरभरा पिकाची काढणी झाली आहे. मात्र, बहुतांश शेतकऱ्यांनी नुकतेच पिकाच्या काढणीस सुरवात केली आहे. आता अवकाळी पावसाचा फटका बसत आहे.