coronavirus - नागरिकांनी स्वत:हून पुढे यावे, अन्यथा कारवाई - जिल्हाधिकारी

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 April 2020

दिल्ली येथील निजामुद्दीन मरकज व उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाना यासह देशाच्या इतर भागांत झालेल्या जमात कार्यक्रमात सहभागी झालेल्या व तेथे जाऊन आलेल्या नागरिकांनी स्वेच्छेने माहिती द्यावी. या लोकांना शोधण्यासाठी प्रशासनाचा वेळ जात असल्याने त्यांनी स्वत:हूनच पुढे यावे. अन्यथा, कारवाईचा इशारा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिला आहे. 

बीड - कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातील विविध विभागांकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजना जोरात असून, पोलिसांकडूनही कडक अंमलबजावणी सुरू आहे. दरम्यान, निजामुद्दीन मरकजला जाऊन आलेल्या नागरिकांनी स्वतःहून पुढे यावे: अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिला आहे. 

दिल्ली येथील निजामुद्दीन मरकज व उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाना यासह देशाच्या इतर भागांत झालेल्या जमात कार्यक्रमात सहभागी झालेल्या व तेथे जाऊन आलेल्या नागरिकांनी स्वेच्छेने माहिती द्यावी. आपल्या जवळच्या शासकीय रुग्णालयात जाऊन तपासणी करून घ्यावी. या नागरिकांनी (०२४४२ - २२२६०४) या क्रमांकावर कोणतीही भीती न बाळगता संपर्क साधावा. प्रशासनातर्फे त्यांना योग्य ते सहकार्य करण्यात येईल. या लोकांना शोधण्यासाठी प्रशासनाचा वेळ जात असल्याने त्यांनी स्वत:हूनच पुढे यावे. अन्यथा, कारवाईचा इशाराही श्री. रेखावार यांनी दिला आहे. 

हेही वाचा -  ‘हे’ माध्यम आहे एकाग्रता वाढविण्यासाठी झक्कास, कोणते? ते वाचाच  

पोलिस कारवायाही जोरात; अब तक ६६८ 
कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी जाहीर केलेल्या संचारबंदी, जमावबंदी, लॉकडाऊनच्या अंमलबजावणीचा भार पोलिसांच्या खांद्यावर आहे. बीड पोलिसांनी ही किमया लिलया पेलली आहे. आतापर्यंत नमाजासाठी व इतर कारणांसाठी एकत्र येऊन जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करणारे, सोशल मीडियावरून कोरोनाबाबत अफवा फैलाविणारे, सोशल मीडियावरून दोन समाजांत तेढ व द्वेष निर्माण करणारे, तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणारे, दुकाने सुरू ठेवणारे अशा ६६८ आरोपींविरुद्ध पोलिसांनी गुन्हे नोंद केले आहेत. सर्वाधिक कारवाया बीड जिल्ह्यात झाल्या आहेत. त्यामुळे उल्लंघन करण्याच्या प्रकारांना मोठा आळा बसला आहे. 

हेही वाचा - कोरोनाचे संकट - दिलपसंदच्या शेतात सोडल्या मेंढ्या! 

बँकांच्या कामकाजांच्या दिवस-वेळांत बदल 
लॉकडाऊनमध्ये संचारबंदी शिथिलतेच्या वेळांत बदल करण्यात आला आहे. त्यामुळे मंगळवारपासून (ता. सात) बँकांच्या कामकाजाचे दिवस व वेळांमध्येही बदल करण्यात आला आहे. बीड, माजलगाव, अंबाजोगाई व परळी या चार नगरपरिषद शहरांमध्ये मंगळवार (ता. सात), गुरुवार (ता. नऊ), शनिवार (ता. ११) व सोमवार (ता. १३) या दिवशी सकाळी ११ ते तीन वाजेपर्यंत बँका सुरू राहतील. तर जिल्ह्याच्या इतर भागांत ता. आठ, ता. १०, ता. १२ व ता. १४ या दिवशी बँका सकाळी ११ ते दोन या वेळेत सुरू राहतील. जिल्ह्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाची सर्व ग्राहक सेवा केंद्र शिथिलतेच्या वेळांत सुरू राहतील. 

हेही वाचा - वर्तमानपत्रे आहेत समाजमनाचा आरसा

फेरसर्वेक्षणाचे काम वेगात 
पुणे-मुंबईसह इतर शहरांतून आलेल्यांचे फेरसर्वेक्षण करण्यात येत आहे. आशा, अंगणवाडी सेविका व ग्रामविकास व आरोग्य विभागातील इतर यंत्रणांचे काम वेगात सुरू आहे. गरजेनुसार यातील लोकांची डॉक्टरांकडून वैद्यकीय तपासणीही करण्यात येत आहे. मागच्या तीन दिवसांपासून हे काम जोरात सुरू आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Citizens should come forward by themselves, otherwise take action