Jalna News : शहराचा पाणीप्रश्न ऐरणीवर ; पंधरा दिवसांआड अनेक भागांत पाणी ; नागरिक बेहाल

उन्हाळ्याची चाहूल लागताच शहरात पाण्याचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यात मागील काही दिवसांपासून पाणी प्रश्‍न अधिक बिकट झाला असून अनेक भागांत दहा ते पंधरा दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे.
jalna
jalnasakal
Updated on

जालना : उन्हाळ्याची चाहूल लागताच शहरात पाण्याचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यात मागील काही दिवसांपासून पाणी प्रश्‍न अधिक बिकट झाला असून अनेक भागांत दहा ते पंधरा दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. या कारभारामुळे नागरिक बेहाल झाले असून विकतच्या पाण्यावर अनेकांना तहान भागवावी लागत आहे. प्रशासनाने याची दखल घेत उपाययोजना करावी अशी मागणी जोर धरत आहे. तर काँग्रेसकडून बुधवारी (ता.३१) महापालिकेसमोर याविरोधात ठिय्या आंदोलन केले जाणार आहे.

जालना शहराला घाणेवाडी जलाशय आणि जायकवाडी धरणावरून पाणी पुरवठा होता. त्यात घाणेवाडी जलाशय कोरडा पडल्याने जायकवाडी धरणावर शहराचा पाणी पुरवठा अवलंबून आहे. अशात महापालिकेकडून जायकवाडी धरणातून २५ ते २६ एमएलडी पाणी रोज उचलण्यात येते. यातील एक ते दोन एमएलडी पाणी हे अंबड येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत दाखल होण्यापूर्वी जलवाहिनीवरील गळतीमुळे वाया जाते. शिवाय अंबड शहराला साडेतीन ते चार एमएलडी पाणी देण्यात येत आहे. अंबड जलशुद्धीकरण केंद्र ते जालना या दरम्यानच्या जलवाहिनीवरही पाणी गळती होत असल्याने शहरात १८ एमएलडी पाणी दाखल होते.

jalna
Jalna : जालना जिल्ह्यात दोन दिवसांत २९६ मराठा कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप ; आतापर्यंत सापडल्या तीन हजार ३१८ नोंदी

मात्र, संपूर्ण शहराची तहान या १८ एमएलडी पाण्यावर भागत नाही. त्यात घाणेवाडी जलाशय कोरडे पडल्याने संपूर्ण शहराला जायकवाडी धरणातून येणाऱ्या पाण्याचा पुरवठा करण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. त्यामुळे शहराची पाणी पुरवठा साखळी लांबली आहे.

शहरातील काही भागांना पूर्वी पाच दिवसांआड पाणी पुरवठा होत होता. त्याच भागांना आज आठ दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. तर काही भागांत दहा ते पंधरा दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याने जालनेकरांना पाणी टंचाईला तोंड देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे पुढील काळात शहरातील पाणी प्रश्‍न अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

jalna
Jalna News : जालनेकरांनी थकवला ११२ कोटींचा कर ; मालमत्ता जप्तीच्या प्रशासन तयारीत, थकबाकीदारांच्या याद्या बनविणे सुरू

काँग्रेस करणार आंदोलन

शहरातील पाणी प्रश्‍न आणि स्वच्छतेच्या प्रश्‍नावर काँग्रेसकडून बुधवारी (ता.३१) महापालिकेसमोर धरणे आंदोलन केले जाणार आहे. सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळेत हे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

शहरातील अनेक भागांना पंधरा ते वीस दिवसांआड पाणी पुरवठा होत आहे. महापालिकेकडून केवळ तांत्रिक अडचणींमुळे पाणी पुरवठा लांबल्याचे सांगितले जाते. मात्र, या तांत्रिक अडचणी कोणत्या आणि त्या कधी सोडवणार यावर महापालिकेकडे उत्तर नाही. स्वच्छतेबाबत पालिका असताना जालना शहर देशात २२ वे तर मराठवाड्यात तिसऱ्या क्रमांकावर होते. आज जालना शहर महापालिकेचा स्वच्छतेच्या यादीत १९५ वा क्रमांकावर आहे. त्यामुळे शहरातील पाणी प्रश्‍न आणि कचरा प्रश्‍न तत्काळ सोडवावा, यासाठी आम्ही धरणे आंदोलन करणार आहोत.

— अक्षय गोरंट्याल, काँग्रेस नेते, जालना

शहराला पाणी पुरवठा करणारे घाणेवाडी जलाशय कोरडे पडले आहे. त्यामुळे जायकवाडी धरणावरून येणाऱ्या पाण्यावर संपूर्ण शहराला पाणी पुरवठा केला जातो. त्यात मागील पंधरा दिवसांत जलवाहिनी फुटणे, वीज कनेक्शन कट होणे, यामुळे काही काळ पाण्याचा खंड पडल्याने पाण्याची साखळी लांबणीवर पडली. परंतु, महापालिकेकडून शहराला आठ दिवसांआड पाणी पुरवठा होईल, असे नियोजन केले आहे. याशिवाय स्वच्छतेसंदर्भात मागील दोन वर्षांचे थकीत बिले अद्याप देणे सुरू आहेत. स्वच्छतेवरील वार्षिक खर्च हा तीन कोटींवर आणला. शिवाय काही घंटागाड्या नादुरूस्त असल्याने अडचणी येत आहे. नवीन घंटागाड्या खरेदीचा प्रस्ताव तयार केला आहे.

—संतोष खांडेकर, आयुक्त, महापालिका, जालना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com