ते आले... रस्ते चकाचक करून गेले

Cleaning-Campaign
Cleaning-Campaign

औरंगाबाद - शहरवासीयांच्या डोळ्यांतून झोपेची गुंगी उतरली नव्हती. सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बाहेरगावाहून ३५ हजार लोक आपापल्या वाहनांनी आले. त्यांनी कोणाच्या सूचनेची किंवा मदतीची वाट न पाहता शहरातील ३३ मुख्य रस्ते चकाचक केले. अचानक लोक येऊन परिसरात झाडत आहेत, कुणी कचरा गोळा करीत आहे, परिसरातील नाल्यात उतरून नाला साफ करीत असलेले पाहून अनेकांना सुखद धक्‍का बसला आणि अवघ्या तीन तासांमध्ये रस्ते स्वच्छ दिसू लागले. या मोहिमेतून अवघ्या तीन तासांत तब्बल २ हजार टनापेक्षा अधिक कचरा गोळा झाला.

सात जिल्ह्यांतील ३५ हजार लोकांनी केली शहरात नियोजनबद्ध साफसफाई
 डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानाच्‍या वतीने डोक्‍यावर गांधी टोपी, खिशाला स्वयंसेवकांचा बॅज आणि हातात झाडू आणि टोपली घेऊन या स्वयंसेवकांनी सकाळी साडेसहापासून शहरातील ३३ मार्गांवर ही १६५ किलोमीटर दुतर्फा मोहीम राबविली. क्रांती चौकात खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते झाडू मारून मोहिमेस प्रारंभ झाला. या वेळी महापौर नंदकुमार घोडेले, प्रतिष्ठानचे ॲड. उमेश भोजने, नेताजी भोसले, सुभाष पाटील, ॲड. सोपान शिंदे, अमोल उबरहंडे, योगेश सोनवणे, गणेश बोधे, पंकज धुमाळ, आमदार अतुल सावे, रेणुकादास वैद्य, गजानन बारवाल, दिव्या मराठे यांची प्रमुख उपस्थित होती. अनोख्या पद्धतीने मनात कोणताही अहंभाव न आणता आपल्या दिलेल्या मार्गावर या स्वयंसेवकांनी प्रामाणिकपणे स्वच्छता राबविली. यात शहरातील नाल्यांची स्वच्छता करण्यात आली. यासह ४० हून अधिक स्मशानभूमीतही पहिल्यांदाच स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आहे. 

काही मिनिटांत चकाचक 
महास्वच्छता अभियानामध्ये स्वयंसेवकांनी राबविलेल्या मोहिमेत रेल्वेस्थानक आणि मध्यवर्ती बसस्थानक काही मिनिटांत चकाचक झाले. मध्यवर्ती बसस्थानक आणि रेल्वेस्थानकात स्वच्छतेचे कंत्राटे दिलेली आहेत. ठेकेदारांनी कधीही चकाचक न केलेले बसस्थानक आणि रेल्वेस्थानक मात्र स्वयंसेवकांनी अवघ्या अर्ध्या तासामध्ये चकाचक करून प्रवाशांना सुखद धक्का दिला. अभियानातील सदस्यांमुळे रेल्वेस्टेशनचा प्रत्येक कोपरा स्वच्छ झाला. रेल्वेस्थानकाच्या प्रवेशद्वारापासून तर जुन्या आणि नव्या इमारतीसमोरील रस्ता सदस्यांनी स्वच्छ केला. अभियानात सदस्यांबरोबर रेल्वे अधिकाऱ्यांनीही सहभाग नोंदविला.

नाल्यांनी घेतला मोकळा श्‍वास 
गटागटांनी मिळून ठरवून दिलेल्या मार्गावर सफाई मोहीम राबवली. रस्त्यामध्ये येणाऱ्या नाल्यांचाही स्वयंसेवकांनी श्‍वास मोकळा केला. महापालिकेने अजून नालेसफाईचा विषय हाती घेतला नसल्याने नाल्यांमध्ये गाळ व कचरा साचल्याने नाले तुंबले होते, तरीही त्याचा विचार न करता डोक्‍यात फक्‍त महास्वच्छता अभियानात शहर स्वच्छ झाले पाहिजे या एकाच विचारातून स्वयंसेवक नाल्यात उतरले. तोंडाला मास्क, हातात ग्लोज घालून उतरलेल्या स्वयंसेवकांनी नाल्यात हात घालून गाळ, कचरा बाजूला केला. अवघ्या तासाभरातच नाल्यांचे प्रवाह मोकळे करण्यात आले. पाणी वाहते झाले किंवा नाही याची खातरजमा करूनच पुढच्या सफाईला सुरवात केली जात होती. या कामाच्या व्यवस्थापनाचा हात कोणी धरणार नाही, असे कार्य आणि सफाईचे नियोजन शहरवासीयांना पाहायला मिळाले. 

शिस्तबद्द नियोजन 
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान महास्वच्छता अभियान असे पोस्टर लावलेल्या वेगवेगळ्या पासिंगची वाहने नियोजित ठिकाणी स्वयंसेवकांना घेऊन सकाळी सातच्या आधी दाखल झाल्या. क्रांती चौकात उद्‌घाटनाच्या औपचारिकतेची वाट न पाहता हातात खराटे, फावडे, टोपले, झुडपे तोडण्यासाठी कुऱ्हाडी घेतलेल्या स्वयंसेवकांनी साडेसात वाजताच स्वच्छतेच्या कामाला सुरवात केली. तीन तासांत ही मोहीम संपवण्यात आली; मात्र नेमून दिलेले काम पूर्ण करूनच मोहीम संपवली. कामात अडथळा येऊ नये यासाठी बरोबरच्या वाहनातच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. बरोबरचा किती काम करतोय यापेक्षा आपण स्वत: किती काम करतोय, यावर प्रत्येकाचे लक्ष केंद्रित झाल्याचे स्पष्टपणे जाणवत होते. 

स्मशानभूमी, दफनभूमी झाल्या स्वच्छ 
स्वयंसेवकांच्या पथकांनी नेमून दिलेल्या मार्गावरील शासकीय कार्यालये, सार्वजनिक ठिकाणांची साफसफाई करण्यात आली. घाटी रुग्णालयातील वैद्यकीय कचरा, उघड्यावर फेकून दिलेले खरकटे, कचरा साफ करून तो उचलून वाहनांमध्ये भरण्यात आला. स्मशानभूमीत सकाळी-सकाळी जाण्याचे कोणी धाडस करीत नाही; मात्र भल्या सकाळपासूनच स्मशानभूमीत प्रतिष्ठानचे स्वयंसेवक जमा झाले होते. त्यांनी महास्वच्छता अभियानाची वेळ होताच कामाला सुरवात केली आणि बघता-बघता शहरातील स्मशानभूमी, दफनभूमीत साफसफाई पूर्ण केली. 

कोणाचा चहाही घेतला नाही 
नाशिक, नगर, सोलापूर, कोल्हापूर, रावेर, जळगाव, मुक्‍ताईनगर येथून प्रतिष्ठानचे स्वयंसेवक या मोहिमेसाठी आले होते; मात्र त्यांनी कोणाचा चहादेखील घेतला नाही. त्यांनी स्वत:चीच शिदोरी बरोबर बांधून आणली होती. काम झाल्यानंतर सर्वांनी बसून एकत्रित आपापल्या पथकांसोबत शिदोरीचा आस्वाद घेतला. कोणाकडून कसलीही अपेक्षा न करता आपले कर्म करीत राहा हा संदेश या मोहिमेच्या माध्यमातून स्वयंसेवकांनी शहरवासीयांना दिला. 

महापालिकेचे घनकचरा विभागाचे नंदकिशोर भोंबे यांनी रात्रीपर्यंत संपूर्ण कचरा डंपिंग यार्डात पोचवल्याचे सांगितले.

स्वच्छतेच्या जागरसाठीच अभियान
ॲड. उमेश भोजने (स्वयंसेवक) - देशाने आपल्यासाठी काय केले हे पाहण्यापेक्षा आपण देशासाठी काय केले हे बघावे. त्याच उद्देशाने आम्ही विविध सामाजिक कामे करीत आहोत. औरंगाबादसह पुणे आणि मुंबई येथेही स्वच्छतेचा उपक्रम राबविला जात आहे. यात लाखो स्वयंसेवक सहभागी झाले. आप्पासाहेब धर्माधिकारी यांची नेमणूक स्वच्छतादूत म्हणून झाली आहे. यामुळे स्वच्छतेचा जागर व्हावा, या हेतूनेच हे महास्वच्छता शिबिर राबविण्यात आले आहे. स्वखर्चाने प्रतिष्ठानचे स्वयंसेवक आले होते. महापालिकेने सहकार्य केले.

स्वयंसेवकांपुढे खासदार नतमस्तक 
स्वच्छता शिबिरात निःस्वार्थपणामुळे समारोप कार्यक्रमात खासदार चंद्रकांत खैरे यांनी हजारो स्वयंसेवकांना दंडवत घातला. तुमची सेवा पाहून अचंबित झालो, असे खासदार खैरे म्हणाले. गावागावांत असे उपक्रम व्हावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. महापौर घोडेले म्हणाले, की आता या कामामुळे शहराचे सर्वत्र नाव होईल. आजच्या पद्धतीने शहर स्वच्छ ठेवू, असे आश्‍वासन त्यांनी दिले.

या भागांत राबवली स्‍वच्‍छता मोहीम
रस्त्यांचा मार्ग                           निघालेला कचरा (किलोमध्ये)

रेल्वस्टेशन ते बाबा पेट्रोलपंप चौक    १४४२५०
रेल्वेस्टेशन ते कोकणवाडी मार्गे क्रांती चौक    ६३३२०
बाबा पेट्रोलपंप ते मध्यवर्ती बसस्थानक मार्गे ज्युबलीपार्क चौक    ३२१५०
बाबा पेट्रोलपंप ते क्रांती चौक मार्गे दूधडेअरी    ६७९५०
दूधडेअरी ते काल्डा कॉर्नर मार्गे दर्गा गेट चौक    ७५४९०
गोपाळ कल्चर हॉल चौक ते गुरुद्वारा, पीरबाजार,     ३९६५
भाजीवाली बाई चौक मार्गे दर्गा गेट चौक
विट्‌स हॉटेल ते देवगिरी कॉलेजमार्गे भाजीवाली बाई चौक    ९२४५
देवळाई ते शिवाजीनगर मार्गे सूतगिरणी चौक    ६११००
बीएसएनएल ते अभिनय टॉकीज, अंगुरीबाग, पानदरिबा,     ४८३००
सराफारोड मार्गे गांधीपुतळा शहागंज
क्रांती चौक ते पैठणगेट, गुलमंडी, सिटी चौक मार्गे नौबत दरवाजा    १३५०५
सतीश मोटार्स ते सावरकर चौक समर्थनगर, निराला बाजार,     ३४६५०२
औरंगपुरा महात्मा फुले पुतळा, जिल्हा परिषद मार्गे मिल कॉर्नर
मोंढा नाका ते जाफरगेट, संस्थान गणपती मार्गे चेलिपुरा    २२२२०
मोंढा नाका ते तानाजी चौक, त्रिमूर्ती चौक,     १२५१९
गजानन महाराज मंदिर, पुंडलिकनगर मार्गे जयभवानीनगर चौक
सूतगिरणी चौक ते रिलायन्स मॉल,     ४१४२६
गजानन महाराज मंदिर मार्गे सेव्हन हिल
जयभवानीनगर ते शिवाजी चौक,     ३३०१३
कामगार चौक मार्गे सिडको बसस्थानक
दूधडेअरी ते मोंढा नाका, आकाशवाणी,     १४१४४
सेव्हन हिल मार्गे सिडको बसस्थानक चौक
सिडको बसस्थानक ते एपीआय कॉर्नर,     १७५६७
पीव्हीआर मार्गे धूत हॉस्पिटल
पीव्हीआर टॉकीज ते मुकुंदवाडी पोलिस स्टेशन, देवगिरी कॉलनी,     १२२२०
संघर्षनगर, ज्ञानेश्‍वर कॉलनी मार्गे रामनगर चौक
सिडको बसस्थानक ते गरवारे कंपनी मार्गे आंबेडकर चौक    २५७०४
आंबेडकर चौक ते रेणुकामाता मंदिर,     १४३९५२
एसबीओए शाळा मार्गे जळगाव टी पॉइंट
एसबीओए शाळा ते सोनई मार्केट, ऑडिटर सोसायटी,     ९३९४८
म्हसोबा मंदिर, श्रीबैठक मार्गे म्हसोबानगर हर्सूल
सेव्हन हिल ते मध्यवर्ती जकात नाका, रोशनगेट,     १८७३३
चंपा चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय
डॉ. आंबेडकर चौक ते बळिराम पाटील शाळा,     ३६९६४
बजरंग चौक, चिश्‍तिया चौक मार्गे मध्यवर्ती जकात नाका
अहल्यादेवी होळकर चौक जळगाव रोड ते टीव्ही सेंटर,     ६९७००
गणेश कॉलनी मार्गे पंचायत समिती
वोखार्ड चौक ते संत तुकाराम नाट्यगृह,     ४८२००
बंजरंग चौक, आझाद चौक मार्गे रोशनगेट
आझाद चौक ते साखरे मंगल कार्यालय,     १४८३२६
टीव्ही सेंटर, सैनिकी शाळा मार्गे डी मार्ट हडको कॉर्नर
हर्सूल जेल ते हडको कॉर्नर, उद्धवराव पाटील चौक मार्गे दिल्ली गेट    ११८४००
दिल्ली गेट ते अण्णा भाऊ साठे पुतळा, नौबत दरवाजा,     ५२२००
कॅन्सर हॉस्पिटल, महापालिका मार्गे भडकल गेट
बीबी-का-मकबरा ते मकाईगेट, विद्यापीठ गेट, पानचक्‍की,     ६२८००
घाटी रोड मार्गे ज्युबली पार्क
पंढरपूर विठ्ठल मंदिर ते ओयासिस चौक,     ६११०
मोरे चौक मार्गे रांजणगाव फाटा
रांजणगाव फाटा ते रांजणगाव ग्रामपंचायत कार्यालय    ३१६६५
पंढरपूर मोरे चौक ते मोहटा देवी मंदिरामागून सिडको गार्डनपर्यंत    ३५२३६
हिंदुस्थान आवास कमान ते बैठक हॉलपर्यंत    ५५६००
एकूण (किलोमध्ये)    २००२१०९
एकूण (टनामध्ये)     २००२.१०९

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com