esakal | जीएसटीच्या किचकट प्रणाली विरोधात परभणीत बंद

बोलून बातमी शोधा

file photo}

जीएसटी कायद्यात सुमारे 42 महिन्यात जवळपास एक हजारावर सुधारणा झाल्यामुळे व्यावसायिक आणि सीए व कर सल्लागार वैतागले आहेत.

जीएसटीच्या किचकट प्रणाली विरोधात परभणीत बंद
sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी : जीएसटी नियमाच्या किचकट प्रणालीला विरोध करत व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला शुक्रवारी (ता.26) परभणी शहरात प्रतिसाद मिळाला. शहरातील सर्वच बाजारपेठेतील व्यापारी प्रतिष्ठाणे बंद होती.

जीएसटी कायद्यात सुमारे 42 महिन्यात जवळपास एक हजारावर सुधारणा झाल्यामुळे व्यावसायिक आणि सीए व कर सल्लागार वैतागले आहेत, असे मत जिल्हा व्यापारी महासंघाने एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे व्यक्त करित आपला रोष व्यक्त केला.आम्हाला जीएसटी, गुड अ‍ॅण्ड सिम्पल टॅक्स हवा होता, पण हा तर फारच गुंतागुंतींचा झाला आहे. तारखांच्या घोळामुळे व्यापारी आणि कर सल्लागार यांना सणवार सुट्टीपण राहीली नाही.

प्रामाणिक करदाता कोणताही मोबदला न घेता कर गोळा करतो आहे. पण तोच सर्वात जास्त आज भरडल्या जात आहे. उदाहरणार्थ एकदा जीएसटी भरुन सरकारमान्य डीलरने तो सरकारी तिजोरीत भरला नाही तरी त्याची शिक्षा जीएसटी भरलेल्यांनाच दिली जात आहे असी खंत व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. सरकारला जागे करण्याकरिता आजचा बंद पुकारला होता. या बंद मध्ये परभणी शहरातील सर्वच बाजारपेठ पूर्णवेळासाठी बंद होती. औषधी विक्रेत्यांनी ही दुपार पर्यंत त्यांची दुकाने बंद ठेवून जीएसटीच्या किचकट प्रणालीला विरोध दर्शविला होता.

व्यापारी कर भरावयाला तयार आहेत, पण या सारख्या सुधारणा आणि नोटीसांना ते अक्षरशः कंटाळले आहेत. व्यापार्यांनी जर कर भरला नसता तर हे जीएसटीचे विक्रमी उत्पादन झालेच नसते. कराचे अनेक आणि विविध दर रिटर्न भरतांना त्रासदायक ठरत आहेत.

- सूर्यकांत हाके. जिल्हाध्यक्ष, व्यापारी महासंघ, परभणी

अनेकवेळा इंटरनेट चालू नाही, त्यामुळे बँकेत भरणा करता येत नाही. जीएसटी साईट बंद असते, त्यामुळे रिटर्न अपलोड करता येत नाहीत, पण हे विचारात न घेता प्रामाणिक करदाता शिक्षा आणि दंडास पात्र ठरत आहे, हे चुकीचे आहे.

- नितीन वट्टमवार, कार्याध्यक्ष, व्यापारी महासंघ, परभणी

कल्याणकारी राज्य कल्पनेत 100 गुन्हेगार सुटले तरी चालतील, पण एकाही निरापराधाला शिक्षा होता कामा नये, हे भारतीय घटनेला मान्य आहे. पण, सरकारला मात्र 100 प्रामाणिक करदात्याला शिक्षा झाली तरी चालेल, पण एकही कर बुडता, सुटता कामानये हे धोरण राबवायचे आहे.

- सचिन अंबिलवादे, सचिव, व्यापारी महासंघ, परभणी

संपादन- प्रल्हाद कांबळे