esakal | लिंगायत आरक्षणाची घोषणा मुख्यमंत्री लवकरच करतील
sakal

बोलून बातमी शोधा

चंद्रकांत खैरे

चंद्रकांत खैरे यांची माहिती; लिंगायत समाज राज्यव्यापी आरक्षण अधिवेशन

लिंगायत आरक्षणाची घोषणा मुख्यमंत्री लवकरच करतील

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लातूर : लिंगायत समाजाला आरक्षण देण्याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नक्कीच घेतील. याबाबतची सकारात्मक घोषणा सोलापुरात होणाऱ्या जाहीर सभेत ते करतील, अशी माहिती शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी रविवारी येथे दिली. लोकसभेच्या निवडणुकीत लातुरात शिवराज पाटील चाकूरकर यांना जसा दगाफटका झाला, तसाच मलाही औरंगाबादेत झाला. तो झाला नसता तर आज मी केंद्रीय मंत्री म्हणून तुमच्यासमोर उभा राहिला असतो. मंत्री झालो नाही. हे माझे दुर्दैव आहे, अशी खंतही खैरे यांनी या वेळी बोलून दाखवली. 


लिंगायत समाजाला सरसकट आरक्षण मिळावे, या मागणीसाठी लिंगायत महासंघाच्या वतीने लिंगायत समाज राज्यव्यापी आरक्षण अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्‌घाटन खैरे यांच्या हस्ते झाले. या वेळी गहिनीनाथ महाराज औसेकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड, आमदार अमित देशमुख, विक्रम काळे, माजी आमदार बाबासाहेब पाटील, शिवाजीराव पाटील-कव्हेकर, महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा. सुदर्शन बिरादार, सरचिटणीस चंद्रकांत काला पाटील उपस्थित होते. 


खैरे म्हणाले, लिंगायत बांधवांची संख्या जवळपास एक कोटीच्या घरात आहे. त्यामुळे समाजाने एकत्र राहायला हवे. आम्ही एक आहोत, हे दाखवून द्यायला हवे. या समाजात अनेक गरीब, दुर्लक्षित आहेत. या सर्वांना न्याय देण्याची भूमिका सरकार नक्कीच घेईल. सोलापूर येथे 31 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांची सभा आहे.

याच सभेत ते आरक्षणाबाबतचा सकारात्मक निर्णय जाहीरपणे सांगतील, याची मला खात्री आहे. प्रा. बिरादार म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी 2018मध्ये आम्हाला 15 दिवसांत आरक्षण देऊ, असे लिंगायत बांधवांना सांगितले होते. तर, 2019 मध्ये आठ दिवसांत हा प्रश्न सोडवू, असे सांगितले. पण, अद्याप हा प्रश्न सुटला नाही. पुढील आठ दिवसांत हा प्रश्न सरकारने सोडवला नाही तर पुन्हा रस्त्यावर उतरण्याशिवाय दुसरा पर्याय आमच्याकडे राहणार नाही. शिवाजी भातमोडे यांनी सूत्रसंचालन केले.  
 

loading image
go to top