जिल्हा रुग्णालयाच्या कारभारावर आता समितीचा ‘वॉच’

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 मे 2020

परभणी जिल्हा रुग्णालयात कोरोना विषाणू संसर्गानंतर कारभार ढेपाळला आहे. यावर ‘सकाळ’ने वारंवार प्रकाश टाकला होता. कोरोना विषाणू संसर्गाच्या आकडेवारीसह आर्थिक कारभारही मोठ्या प्रमाणात ढेपाळला होता. याचा विपरित परिणाम आरोग्य सेवेवर होत होता. यावर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालून हे प्रकरण गांभिर्यांने घेतले.

परभणी : परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयाचा ढेपाळलेला कारभार सुधारण्यासाठी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सहा सदस्यांची समिती नियुक्त केली असून या समितीच्या माध्यमातून जिल्हा रुग्णालयासह कोविड रुग्णालयाच्या दैनंदिन कारभारावर लक्ष ठेवले जाणार आहे. या समितीमध्ये जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकाऱ्यासह आरोग्य विभागातील तज्ज्ञ, पोलिस अधिकारी यांचा समावेश आहे.
परभणी जिल्हा रुग्णालयात कोरोना विषाणू संसर्गानंतर कारभार ढेपाळला आहे. यावर ‘सकाळ’ने वारंवार प्रकाश टाकला होता. कोरोना विषाणू संसर्गाच्या आकडेवारीसह आर्थिक कारभारही मोठ्या प्रमाणात ढेपाळला होता. याचा विपरित परिणाम आरोग्य सेवेवर होत होता. यावर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालून हे प्रकरण गांभिर्यांने घेतले. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी जिल्हा रुग्णालयाच्या कारभारावर नियंत्रण आणण्यासाठी सहा सदस्यीय समिती स्थापन करून कारभारावर वॉच ठेवण्यास सुरवात केली आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी (ता. २९) आदेश काढला आहे.

हेही वाचा : परभणीत स्वॅब तपासणारी प्रयोगशाळा बंद; कारण गुलदस्त्यात

 

सहा सदस्यांची नियुक्ती
या आदेशात नोडल अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. या आदेशात जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, सद्यःस्थितीत आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता परभणी जिल्हा सामान्य रुग्णालय व कोविड रुग्णालय येथील यथोचित व्यवस्था करणे आवश्यक आहे. जेणे करून अत्यावश्यक सेवेच्या कामाचे व्यवस्थापन कोलमडणार नाही. जिल्हा सामान्य रुग्णालय व कोविड रुग्णालय येथील सर्व प्रश्नांची समन्वयाने सोडवणूक करण्यासाठी तसेच जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या संपर्कात राहून इतर अनुशंगिक कामे करण्यासाठी हे सहा सदस्य नियुक्त केले आहेत. त्यात जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळिक, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रकाश डाके, पोलिस निरीक्षक गजानन सौदाने, प्रवीण खेर्डेकर, लिपिक अभिजित तळेगावे व वरिष्ठ लिपिक जावेद खान यांचा या समितीमध्ये समावेश आहे.

हेही वाचा : ‘या’ माफियांवर आली संक्रांत, महसुल पथकाने ४० तराफे जाळले

आर्थिक गडबडही होणार उघड
कोविड रुग्णालयात खरेदी करण्याचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सकांना देण्यात आले आहेत. या काळात मोठ्या प्रमाणात साहित्याची खरेदी झाली आहे. परंतु, या खरेदीमध्येही प्रचंड प्रमाणात अनियमितता असल्याचे समोर येत आहे. ही खरेदी व त्यावर झालेला खर्च याची तपासणीदेखील समिती करणार अशल्याचे समजते. त्यामुळे कोविड संसर्गात कोणाचे खिसे किती भरले याची माहिती समोर येणार आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Committee's 'watch' on district hospital management now Parbhani News