सुटीत घरातल्या घरात मुलांसाठी बाल झुंबड 

सुहास सदाव्रते 
गुरुवार, 26 मार्च 2020

सुटीने टीव्ही आणि मोबाईल खेळही आता कंटाळवाणे व्हायला लागले आहे. अशा सुटीतही घरातल्या घरात मुलांसाठी विविध उपक्रम अन स्पर्धाचे आयोजन जालन्यात अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था शाखेतर्फे करण्यात आले आहे. 

जालना - मुले चंचल अन अवखळ असतात.नानाविध प्रश्नांची उत्तरे माहित करून घेण्यासाठी ते आई वडिलांकडे सारखा तगादा लावतात. अशी परिस्थिती घरोघर पाहायला मिळते आहे. सक्तीच्या सुटीने टीव्ही आणि मोबाईल खेळही आता कंटाळवाणे व्हायला लागले आहे. अशा सुटीतही घरातल्या घरात मुलांसाठी विविध उपक्रम अन स्पर्धाचे आयोजन जालन्यात अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था शाखेतर्फे करण्यात आले आहे. 

सध्या कोरोना व्हायरस घटनेच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी आणि लॉकडाऊन आहे. यातच मुलांना सक्तीच्या सुट्या आहेत. शाळेत जाणारी मुले सुटीत घरीच असल्याने त्याचे वेळापत्रक मात्र बदलले आणि बिघडले असल्याचे चित्र पाहायला मिळते आहे. सुटी आहे पण बाहेर जाता येत नाही, आणि घरात सारखा टीव्ही पाहून आणि मोबाईल खेळून कंटाळवाणे होत असल्याचे अनुभव मुलांनी सांगितले. मुलांची चंचलता आणि उठाठेवने पालकवर्गाही त्रस्त झाल्याचे चित्र शहरात घराघरात पाहायला मिळते आहे. सक्तीच्या सुटीचा सदुपयोग व्हावा, या हेतूने अमरेंद भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था जालना शाखेतर्फे ' बाल झुंबड ' हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. मुलांनी घरातल्या घरात या उपक्रमात सहभाग घ्यायचा आहे. पुढील महिन्यात १५ एप्रिलनंतर विविध स्पर्धांचे साहित्य जमा करावे लागणार आहे. त्यानंतर स्पर्धांचा निकाल जाहीर करण्यात येईल. सहभागी होण्यासाठी कुठलेही शुल्क नाही. इयत्ता पाचवी ते नववी वर्गातील विद्यार्थी सहभागी होवू शकतात. पहिले बक्षीस ५०० रुपये, दितीय ३०० तर तृतीय बक्षीस २०० यासह दोन उत्तेजनाथ बक्षीस ठेवण्यात आले असल्याचे संयोजकांनी सांगितले. सहभागी होण्यासाठी संपर्क पवन कुलकर्णी : ९०४९८०००८० असा आहे. 

सध्या सुट्या असल्याने मुले घरातच बसून आहे. मुलांनी घरात राहूनच उपक्रमात सहभागी होवून आपले छंद व आवड जोपासावी यासाठी आम्ही ' बाल झुंबड ' या उपक्रमाचे आयोजन केले आहे. 
- संतोष लिंगायत 
कार्याध्यक्ष , शाखा जालना 

 

  • स्पर्धेतील उपक्रम
  • दैनंदिनी लिहिणे 
  • चित्र काढून रंगविणे 
  • आई- बाबांना केलेली मदत : अनुभव लेखन 
  • टाकावूपासून टिकाऊ वस्तू बनविणे 
  • आवडत्या चित्रांची डायरी 
  • सुटीत आलेला अनुभव लेखन 
  • घराची स्वच्छता माझा सहभाग 
  • 'श्यामची आई ' पुस्तकावर तुमचे मत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Competition for children in Jalna