ऐकावे ते नवलच, औरंगाबादेत चक्‍क भिंतच हरवली

अतुल पाटील
Saturday, 7 December 2019

महापालिका प्रशासनाने या गंभीर समस्येची दखल घेऊन अदृष्य किंवा चोरीला गेलेली छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा मैदानाची भिंत शोधून परिसरातील नागरिकांचा श्वास मोकळा करावा. तसेच संबंधितावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी महापौर, आयुक्त, उपायुक्त यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. 

औरंगाबाद - ज्ञानेश्‍वरांनी भिंत चालवल्याची अख्यायिका सांगितली जाते. अगदी असेच काहीसे औरंगाबादेत घडले आहे. झालेय असे की, शहरातील छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथील संरक्षक भिंत चोरीला गेली आहे. ती शोधून द्यावी, अशी मागणी मनसेने महापालिकेकडे केली आहे. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (ता. सहा) महापालिकेच्याच शिपायाला निवेदन देण्याचा आग्रह धरून महापलिकेचा निषेध व्यक्त केला. 

महापालिका प्रशासनातर्फे एसटी कॉलनीत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज या मैदानाच्या चारही बाजूला खुलेआमपणे शहरातील विविध ठिकाणचा कचरा आणून टाकला जात आहे. मैदानावर रात्रीच्या वेळी दारुड्यांनी अड्डा बनविला आहे. याचा परिसरातील नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे हरवलेली संरक्षक भिंत शोधून देण्याबाबत मनसेने उपायुक्त सुमंत मोरे यांना निवेदन देत घेराव घातला. 

वाचा आणि शेअर करा - औरंगाबाद : रुग्णांना घरपोच मोफत रिक्षा, या क्रमांकावर करा काॅल 

मैदानात नागरिकांच्या सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमासाठी खुले सभागृह तयार करण्यात आले होते; मात्र या सभागृहाच्या मागील बाजूची भिंत पूर्णपणे तोडून महापालिका प्रशासन व सत्ताधाऱ्यांच्या संगनमताने छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा मैदानाची जागा बिल्डरच्या घशात घालण्याचा घाट मांडला आहे. असा आरोप मनसेने निवेदनाद्वारे केला आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने असलेल्या या मैदानाची वाईट अवस्था झाल्याने अवमानकारक तसेच थट्टा केल्यासाखी लाजिरवाणी गोष्ट आहे. याकडे आपण जबादार अधिकारी म्हणून गांभीर्याने लक्ष द्यावे; अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या स्टाईल ने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल. असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष सतनामसिंग गुलाटी, विधानसभा विभाग अध्यक्ष अशोक पवार यांनी सांगितले. 

महापालिका प्रशासनाने या गंभीर समस्येची दखल घेऊन अदृष्य किंवा चोरीला गेलेली छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा मैदानाची भिंत शोधून परिसरातील नागरिकांचा श्वास मोकळा करावा. तसेच संबंधितावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी महापौर, आयुक्त, उपायुक्त यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. 

निवेदनावर श्री. गुलाटी, श्री. पवार, अब्दुल रशीद, नंदू गोटे, प्रशांत दहिवाडकर, चंदू नवपुते, संतोष कुटे, आशुतोष राजकडे, राजीव जावळीकर, मंगेश साळवे, बाबुराव जाधव, लीला राजपूत, सपना ढगे, अनिता लोमटे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Complaint for missing wall At Aurangabad