बंदला परभणीत संमिश्र प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक
सुधारित नागरिकत्व कायदा रद्द करण्याची मागणी 

परभणी ः सुधारित नागरिकत्व कायदा रद्द करावा, या मागणीसाठी वंचित आघाडीच्यावतीने पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला शुक्रवारी (ता.२४) परभणीत संमिश्र प्रतिसाद मिळाला. बंदच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिसांनी शहरात चोख बंदोबस्त ठेवला होता.

सुधारित नागरिकत्व कायदा रद्द करावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने करण्यात आली आहे. या संदर्भात दोन दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. धर्मराज चव्हाण यांनी या संदर्भात पत्रकार परिषद घेवून बंदची माहिती दिली होती. बंद दरम्यान नागरिकांनी, व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन ही त्यांनी केले होते.

वंचित बहुजन आघाडीचे नेते रस्त्यावर
शुक्रवारी सकाळी वंचित बहुजन आघाडीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते शिवाजी चौकात जमण्यास सुरुवात झाली होती. सकाळी १०.३० वाजता अनेक कार्यकर्त्यांनी दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन करत शहरातून रॅली काढली. या रॅलीत डॉ. धर्मराज चव्हाण यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे नेते अलमगीर खान आदी उपस्थित होते. या वेळी शिवाजी चौक ते शनिवार बाजार, सुभाष रोड, शिवाजी रोड, गुजरी बाजार, क्रांती चौक, स्टेशनरोड या प्रमुख बाजारपेठेतील दुकाने सकाळी उघडलीच नाही. परंतू, ११ नंतर  काही भागातील दुकाने अर्धवट उघडी ठेवण्यात आली होती.

शहरात पोलिसांचा बंदोबस्त वाढविला
बंदच्या पार्श्वभूमीवर परभणी पोलिसांनी शहरात कडक बंदोबस्त ठेवला होता. प्रमुख बाजारपेठ असलेल्या शिवाजी चौक, गुजरी बाजार व क्रांतीचौक या भागात अतिरिक्त पोलिस तैनात करण्यात आले होते. बंद नियोजित असल्याने शहरातील शाळांना आज सुट्टी देण्यात आली होती.

हेही वाचा - उदगीर शहरात बंदला संमिश्र प्रतिसाद

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी
शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी एकत्र जमून शुक्रवारी दुपारी प्रचंड घोषणाबाजी केली. या वेळी केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यात आला.

हेही वाचा - औसा, निलंगा, जळकोट, शिरुरमध्ये कडकडीत बंद

एसटी महामंडळाच्या काही फेऱ्या रद्द
वंचित बहुजन आघाडीकडून सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करत पुकारण्यात आलेल्या बंदमुळे परभणीच्या एसटी महामंडळाकडून काही फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. सकाळी लवकर लांबपल्ल्याच्या गाड्या सोडण्यात आल्या. परंतू, नंतर सकाळी दहापासून बसगाड्या बंद ठेवण्यात आल्याची माहिती एसटी महामंडळाच्या सूत्रांनी दिली.

विविध तालुक्यातही बंदला पाठिंबा
जिल्ह्यातील पुर्णा, जिंतूर, सेलू, मानवत, पालम, गंगाखेड, पाथरीसह विविध ठिकाणी बंद आयोजित केला होता. हा बंद बऱ्याच तालुक्यात यशस्वी झाल्याचे पहावयास मिळाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Composite response to the test band