इंधन दरवाढी विरोधात लातुरात काँग्रेसचे निदर्शने, सायकलवरुन गाठले कार्यालय

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार ता. सात जूनपासून दररोज पेट्रोल-डिझेलमध्ये दरवाढ करत सामान्य जनतेला लुटत आहे. देश गंभीर संकटाचा सामना करीत असताना मोदी सरकार अन्यायी इंधन दरवाढ करून नफेखोरी करीत आहे. याविरोधात काँग्रेसच्या वतीने सोमवारी (ता.२९) लातूर येथील काँग्रेस भवनसमोर काँग्रेसच्या वतीने केंद्र शासनाच्या विरोधात निदर्शने करण्यात आली.

लातूर  : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार ता. सात जूनपासून दररोज पेट्रोल-डिझेलमध्ये दरवाढ करत सामान्य जनतेला लुटत आहे. देश गंभीर संकटाचा सामना करीत असताना मोदी सरकार अन्यायी इंधन दरवाढ करून नफेखोरी करीत आहे. याविरोधात काँग्रेसच्या वतीने सोमवारी (ता.२९) येथील काँग्रेस भवनसमोर काँग्रेसच्या वतीने केंद्र शासनाच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. त्यानंतर आमदार धीरज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने सायकलवर जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन इंधन दरवाढ कमी करावी, अशा मागणीचे निवेदन दिले.

दररोजच्या भाववाढीमुळे पेट्रोल प्रतिलिटर ९.१२ रुपये तर डिझेल ११.०१ रुपयांनी वाढले आहे. त्यामुळे एक लिटर पेट्रोलला ८७ ते ८८ रुपये मोजावे लागत आहेत. ही भाववाढ अशीच राहिली तर पेट्रोल १०० रुपये लिटरवर जाण्याची भीती आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी असतानाही मोदी सरकार त्याचा लाभ सामान्य जनतेला दिला जात नाही. कोरोनामुळे लोकांचे रोजगार गेले आहेत, उद्योग-व्यवसाय अजून पूर्वपदावर आलेले नाहीत. त्यात ही भाववाढ सामान्य जनतेवर अन्याय करणारी आहे. त्यामुळे काँग्रेसच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. काँग्रेस भवन येथे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, शहराध्यक्ष ॲड. किरण जाधव, महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

लातूर शंभरीच्या अन् जिल्हा तीनशेच्या उंबरठ्यावर, कोरोनाचा वाढता आलेख

त्यानंतर पीव्हीआर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत केंद्र शासनाच्या निषेधाच्या घोषणा देत सायकल फेरी काढण्यात आली. याचे नेतृत्व आमदार धीरज देशमुख यांनी केले. या फेरीतही कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. या आंदोलनात पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष अॅड. व्यंकट बेंद्रे, माजी शहर जिल्हाध्यक्ष मोईज शेख, अभय साळुंके, प्रवीण पाटील, राजेसाहेब सवई, मोहन सुरवसे, सुपर्ण जगताप, सिकंदर पटेल, देविदास बोरुळे, प्रवीण सूर्यवंशी, श्‍याम भोसले, सचिन पाटील, सचिन दाताळ, ॲड. समद पटेल, दगडू पडिले आदी सहभागी झाले होते.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress Andolan Against Fuel Price Hike Latur News