esakal | आघाडीला वंचित-एमआयएमचा झटका
sakal

बोलून बातमी शोधा

ambedkar-owaisi

वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात अनेक जागांवर लक्षणीय मते मिळवून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला झटका दिला होता. तसाच फटका आता विधानसभा निवडणुकीतही दिला आहे. शिवाय एमआयएमचा फटकाही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला बसला आहे.

आघाडीला वंचित-एमआयएमचा झटका

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद - वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात अनेक जागांवर लक्षणीय मते मिळवून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला झटका दिला होता. तसाच फटका आता विधानसभा निवडणुकीतही दिला आहे. शिवाय एमआयएमचा फटकाही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला बसला आहे.

  उस्मानाबाद - या मतदारसंघात शिवसेनेचे कैलास पाटील हे ८७,४८८ मते घेऊन विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजय निंबाळकरांना ७४ हजार २१ मते मिळाली, तर ‘वंचित’च्या धनंजय शिंगाडे यांनी १५ हजार ७५५ मते घेतली. तुळजापूरमध्ये भाजपचे राणा जगजितसिंह पाटील यांनी काँग्रेसच्या मधुकर चव्हाण यांचा जवळपास सहा हजार मतांनी पराभव केला. या ठिकाणी ‘वंचित’चे अशोक जगदाळे यांना ३५ हजार १८३ मते मिळाली. 

बीड - गेवराई मतदारसंघात भाजपचे लक्ष्मण पवार हे  सात हजार मतांनी विजयी झाले. इथे ‘वंचित’चे विष्णू देवकाते यांना साडेआठ हजार मते मिळाली. 

नांदेड - नांदेड उत्तरमध्ये डी. पी. सावंत यांना वंचित आणि एमआयएमने झटका दिला. येथे शिवसेनेचे बालाजी कल्याणकर ६२,८८४ मते घेऊन विजयी झाले. सावंत यांना ५०,८९४ मते मिळाली. एमआयएमचे फिरोज लाला यांना ४१, ८९२ मते, तर ‘वंचित’च्या मुकुंदराव चावरे यांना २६, ५६९ मते मिळाली. 

औरंगाबाद - पैठण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे संदीपान भुमरे हे ८३,४०३ मते घेऊन विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्तात्रय गोर्डे यांना ६९,२६४ मते मिळाली, तर ‘वंचित’चे विजय चव्हाण यांना २०,६५४ मते आणि ‘एमआयएम’चे प्रल्हाद राठोड यांना १७,२१२ मते मिळाली. 
 
परभणी - जिंतूर मतदारसंघात भाजपच्या मेघना बोर्डीकर या तीन हजारांच्या मताधिक्‍याने विजयी झाल्या. ‘वंचित’चे मनोहर वाकळे यांना येथे १३,१९६ मते मिळाली. 

हिंगोली - कळमनुरी हा काँग्रेसचा बालेकिल्ला असतानाही भाजपचे संतोष बांगर विजयी झाले. ‘वंचित’चा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. 

एमआयएमचा  टक्का वाढला
एमआयएमने मोजक्‍याच ४४ जागांवर उमेदवार दिले. या उमेदवारांनी राज्यात १.३४ टक्के म्हणजेच एकूण सात लाख ३७ हजार ८८८ मते मिळविली. मागील जागा राखण्यात पक्षाला अपयश आले असले तरी मालेगाव मध्य, धुळे शहर या नवीन ठिकाणी शिरकाव करत विजय मिळविला. या निवडणुकीत त्यांचे पाच उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिले. गेल्या निवडणुकीत त्यांना राज्यात ०.९ टक्के मते मिळाली होती.