परभणी जिल्ह्यात संतधार पावसाचा पिकांना फटका, शेतकरी पुन्हा संकटात

संजय मुंडे, अनिल जोशी
Friday, 21 August 2020

रिपरिप सुरू असल्याने पावसाने परभणी जिल्ह्यात दानादान उडाली आहे. करपरा, दुधना, कसुरा नद्यांसह छोटे मोठे ओढे भरून वाहत आहेत. त्यामुळे खरिपाच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. 

सेलू (जि. परभणी) : सेलू शहरासह तालुक्यात गेल्या दहा ते १२ दिवसांपासून हलक्या, मध्यम व जोराचा पाऊस पडत आहे. मंगळवार (ता.१८) सोडला तर सतत रिपरिप सुरू असल्याने पावसाने तालुक्यासह जिल्ह्यात दानादान उडाली आहे. करपरा, दुधना, कसुरा नद्यांसह छोटे मोठे ओढे भरून वाहत आहेत. त्यामुळे खरिपाच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. 

तालुक्यात काही दिवसापासून सूर्यदर्शन झाले नाही. वातावरण पूर्णतः बदलले आहे. विशेषतः हवेत चांगलाच गारवा निर्माण झाला आहे. त्याच बरोबर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सतत सुरु आहे. दरम्यान दहा ते १२ दिवस तालुक्यात पावसाची झड लागल्याने झाल्याने नागरिक, शेतकरी अक्षरशः हतबल झाले आहेत. पावसाने पत्रे, स्लॅब, भिंती मोठया प्रमाणावर गळू लागल्या आहेत. आरसीसी बांधकामामधून सुध्दा पाण्याचा  ओल फुटत आहे. 

हेही वाचा - नांदेड जिल्ह्यात संततधार पावसामुळे उडीद, मुगाला फुटले मोड

साथीच्या आजाराने डोके वर काढले
थंडगार वातावरण निर्माण झाल्याने साथीचे आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. सर्दी, थंडीताप, खोकला सारख्या साथीच्या आजाराने डोके वर काढले आहे. दररोजच्या दमट वातावरणाने खाजगी रुग्णालयातील रुग्ण संख्येत वाढ होत आहे. सतत पडत असलेल्या पावसामुळे खरिपाच्या पिकांना मोठा फटका बसला. काढणीस आलेल्या मुगाचे शंभर टक्के नुकसान झाले. कापूस, सोयाबीन पिकांच्या शेतात पाणी साचल्याने पिके पिवळी पडून सुकून जात आहेत.   

हे देखील वाचा - हिंगोलीने मिळविला देशभरात मान, पंतप्रधानांच्या हस्ते पुरस्कार वितरण

जोमात आलेले मुगाचे पीक गेले कोमात
झरी :
 आठ दिवसांपासून सलग रिमझिम पाऊस झाल्यामुळे काढणीला आलेल्या मुगाचे नुकसान झाले. मुगाच्या शेंगा काही ठिकाणी फुटून मोड निघाल्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती फारसे काही पडणार नाही. परिणामी मूगाच्या उत्पन्नात मोठी घट होणार हे निश्चित आहे. यंदा सोयाबीन, तूरनंतर खरीप हंगामात शेतकऱ्यांचा ओढा मूग पेरण्याकडे होता. वेळेवर पाऊस पडल्याने मुगाचे पीक आले. दोन महिन्याच्या कालावधीत येणाऱ्या या पीकाला चांगली फुले येऊन शेंगाही लगडल्या. 

येेथे क्लिक कराच - Video : नांदेडमध्ये आहे जुन्या गाण्यांवर व्यक्त होणारा अंगत-पंगत कार्यक्रम

संततधार पावसाचा परिणाम
यावर्षी प्रथमच मान्सूनचा पाऊस वेळेवर झाला. गेल्या सहा दिवसांपासून कुठे रिमझिम, कुठे आधिक तर कुठे बारीक भुरभुर चालू आहे. सूर्यदर्शनच न झाल्यामुळे कमी कालावधीत हातात येणारे मूगाचे पीक मात्र अडचणीत आले आहे. सध्या मूग काढणीला आला असून पावसाने उघडीप न दिल्याने बऱ्याच ठिकाणी मुगाचे पीक संकटात सापडले. घाई-गरबड करून हाती आलेले पीक पदरात पाडून घेण्यासाठी शेतकरी आटोकाट प्रयत्न करीत आहे. 

संपादन ः राजन मंगरुळकर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Continuous Rains Hit Crops Farmers In Crisis Again Parbhani News