esakal | राष्ट्रीय पेयजलच्या गुपचूप ई-निविदेवरून गदारोळ
sakal

बोलून बातमी शोधा

प्रतिकात्मक छायाचित्र

फेरनिविदा काढण्याची सदस्यांची मागणी; पुन्हा चूक न होण्याच्या आश्वासनानंतर पडदा 

राष्ट्रीय पेयजलच्या गुपचूप ई-निविदेवरून गदारोळ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लातूर : राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमातून मंजूर कामांच्या ई-निविदा वृत्तपत्रात प्रसिद्ध न करता गुपचूप काढण्यावरून जिल्हा परिषदेच्या बुधवारी (ता. चार) झालेल्या सर्वसाधारण सभेत गदारोळ झाला. भाजपचे गटनेते महेश पाटील यांनीच हा विना जाहिरातीचा कार्यक्रम उघड करून सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर दिला. जिल्हा परिषद सदस्य धीरज देशमुख यांच्यासह कॉंग्रेसच्या सदस्यांनीही याप्रकरणी आक्रमक भूमिका घेऊन सभात्याग करण्याचा प्रयत्न केला. शेवटी यापुढे अशी चूक होणार नाही, अशी हमी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके यांनी दिल्यानंतर या वादावर पडदा पडला. 


पेयजल कार्यक्रमातून मंजुरी मिळालेल्या विविध कामांच्या जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने ई-निविदा काढल्या. त्या उघडण्यातही आल्या. मात्र, ई-निविदा काढल्याची प्रसिद्धी वृत्तपत्रांतून प्रसिद्धी दिली नाही. सरकारच्या धोरणानुसार अशी प्रसिद्धी देणे बंधनकारक आहे. पदाधिकाऱ्यांनाही अंधारात ठेवून अधिकाऱ्यांनी परस्पर हा प्रकार केल्यामुळे कामांत स्पर्धा झाली नाही, अशी भावना सदस्यांनी व्यक्त केली.

त्यावर नजरचुकीने हा विषय राहून गेल्याची कबुली कार्यकारी अभियंता बाळासाहेब शेलार यांनी दिली. त्यानंतर निविदा रद्द करून फेरनिविदा काढण्याची मागणी सदस्यांनी केली. फेरनिविदा काढण्यास विधानसभा निवडणूक आचारसंहितेचा अडथळा येऊन कामे प्रलंबित राहतील, असे श्री. तिरुके यांनी निदर्शनास आणून दिले. या विषयावर बहुमतांनी निर्णय घेण्याची मागणी सुरेश लहाने यांनी केली.

बांधकाम सभापती प्रकाश देशमुख यांनी आचारसंहितेत प्रक्रिया अडकून बसण्याची भीती व्यक्त केली. मात्र, महेश पाटील फेरनिविदेवर ठाम राहिले. त्यांना धीरज देशमुख यांनी पाठिंबा देत चुकीचा पायंडा पाडू नये व चुकीच्या कामावर पडदा टाकू नये, अशी मागणी केली. या ठरावासाठी मतदान घेण्याची मागणी केली. त्यावरून चांगलाच पेच निर्माण झाला.

या विषयावरून देशमुख व कॉंग्रेसचे सदस्य सभात्याग करू लागले. सभापती देशमुख यांनी त्यांना रोखत मार्ग काढण्याची भूमिका घेतली. यातच महेश पाटील यांची आक्रमकता कमी झाली. पुन्हा अशी चूक झाली तर राजीनामा द्यावा लागेल, याची जबाबदारी उपाध्यक्षांनी घ्यावी, असे सांगत माघार घेण्याची तयारी धीरज देशमुख यांनी दाखवली व वादावर पडदा पडला. 

लातुरे यांनी मानले आभार 
दुपारी चार वाजता अध्यक्ष मिलिंद लातुरे सभागृहात आले. त्यापूर्वी उपाध्यक्ष तिरुके यांनी कामकाज सांभाळले. सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. शेवटी अध्यक्ष लातुरे यांनी सर्व सदस्यांचे आभार मानले. ते म्हणाले, ""यापुढील सभा माझ्या अध्यक्षतेखाली होईल किंवा नाही, हे मला माहिती नाही. मी गरीब शेतकरी कुटुंबांतील असून मला कामाचा काहीच अनुभव नसताना मागील अडीच वर्षांत सर्व सदस्यांनी मला सांभाळून व समजून घेतले. त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे.''  

loading image
go to top