येथे सुविधायुक्‍त साकारणार बसस्‍थानक

संजय कापसे
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

-हिंगोली-नांदेड महामार्गावरील महत्वाचे बसस्थानक
-सध्याच्या बसस्थानकाची दुरवस्था
-व्यापारी गाळे, पोलिस चौकीमुळे प्रवाशांना सुविधा
-अत्याधुनिक बसस्थानकामुळे विकासाला मिळणार चालना

कळमनुरी(जि. हिंगोली): येथील जुने बसस्थानक पाडून नवीन अत्याधुनिक बसस्थानकाची इमारत उभारण्यात येणार आहे. यामध्ये व्यापरी संकुल, पोलिस चौकी, हिरकणी कक्षाचा समावेश असणार आहे. यामुळे प्रवाशांना सुविधा उपलब्ध होणार आहेत. यासाठी एक कोटी १८ लाख ३८ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरण या बसस्थानकाचे काम हाती घेण्यात येणार आहे. 

कळमनुरी येथे १९८५ च्या दशकात उभारण्यात आलेल्या बसस्थानकाची दुरवस्था झाली आहे. इमारत मोडकळीस आली असून  या ठिकाणी नवीन अत्याधुनिक बसस्थानकाची इमारत उभी राहावी याकरिता तत्कालीन आमदार ॲड. राजीव सातव यांनी प्रयत्न चालवले होते. त्यावेळेस शासनाने कळमनुरी येथे नव्याने बसस्थानकाची इमारत उभी करण्याकरिता मंजुरी दिली होती. 

आकर्षक वास्तू उभारणार

त्यानंतर शासनाकडून याठिकाणी अत्याधुनिक बसस्थानक, चौदा गाळे असलेले व्यापारी संकुल, हिरकणी कक्ष, पोलिस चौकी, महिला व पुरूषांकरिता प्रसाधनगृह व आठ गाळ्यांचे बसस्थानक उभारण्याकरिता एस.टी. महामंडळातर्फे बसस्थानकाची आकर्षक वास्तू उभारण्याकरिता वास्तू रचनाकाराकडून इमारतीच्या डिझाईन मागवण्यात आले होते. त्यामधून महामंडळाने आकर्षक इमारत असलेल्या डिझाईनची निवड केली होती. 

एक कोटी ७८ लाख ३८ हजार रुपयांचा निधी मंजूर

त्यानंतर आता कळमनुरी येथे नवीन इमारत बांधकामासाठी शासनाने एक कोटी ७८ लाख ३८ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. बांधकामाचे कंत्राट परभणी येथील कंत्राटदाराला देण्यात आले आहे. दोन दिवसापूर्वी येथील बसस्थानकाच्या नवीन इमारतीचे बांधकाम हाती घेण्याकरिता विभागीय नियंत्रक मुक्तेश्वर जोशी, कार्यकारी अभियंता श्री. कळगी, विभागीय अभियंता श्री. सरोदे, शाखा अभियंता ए. एल. माने, आगारप्रमुख अभिजीत बोरीकर यांनी येथील जागेची पाहणी करून बांधकामाचा आराखडा तयार केला आहे. 

जुनी इमारत लवकरच पडणार

बसस्थानक इमारतीचे बांधकाम लवकरच हाती घेण्यात येणार असून बांधकाम घेतलेल्या कंत्राटदाराला दिलेल्या मुदतीत बसस्थानकाची इमारत बांधून तयार करावी लागणार आहे. तशा आशयाचे करारपत्रक महामंडळाने तयार करून घेतले आहे. त्यामुळे बसस्थानकाची जुनी इमारत पाडण्याचे काम लवकरच हाती घेतले जाणार असल्याची माहिती विभागीय नियंत्रक कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

तात्पुरत्या शेडची उभारणी

नवीन इमारतीचे बांधकाम करण्याकरिता सध्या असलेली बसस्थानकाची इमारत पाडण्यात येणार आहे. बसस्थानकाची पर्यायी व्यवस्था म्हणून तात्पुरत्या स्वरूपात बसस्थानकाच्या आवारात शेडची उभारणी केली जाणार आहे. त्या दृष्टीने संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Convenient bus station located here