कोथिंबिरीला मिळेना भाव, पण बियाण्यातून शेतकऱ्यांनी शोधला नवा मार्ग

जलील पठाण
Saturday, 5 December 2020

चाळीस दिवसांत लाखांवर उत्पादन देणारे अत्यल्पकालीन पीक म्हणून औसा तालुक्यात अलीकडे कोथिंबीर घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.

औसा (जि.लातूर) : चाळीस दिवसांत लाखांवर उत्पादन देणारे अत्यल्पकालीन पीक म्हणून औसा तालुक्यात अलीकडे कोथिंबीर घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. तेजीच्या काळात एकरात तीन लाखांपर्यंत पैसे येत असल्याने तालुक्यातही कोथिंबिरीची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून कोथिंबिरीचे दर कोसळल्याने घातलेला खर्चही निघत नाही. यावर उपाय म्हणून शेतकरी आता त्याचे बियाणे तयार करून बियाण्यातून आर्थिक मार्ग शोधत आहेत. चांगल्या दर्जेदार आणि गावराण बियाण्याला किलोला दोनशे ते तीनशे रुपये दर मिळत असल्याने यामधूनही चांगले पैसे मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

औसा तालुक्यात नागरसोगा, तपसे चिंचोली, आशिव, उजनी, मतोळा, दावतपुर, तुंगी ही अशी गावे आहेत की येथील मुख्य पीक कोथिंबीर आहे. चाळीस दिवसांत काढणीस येणाऱ्या पिकाने अनेकांना लखपती बनविले आहे. पण हेच पीक मंदीच्या काळात शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडते. भाव चांगला मिळत असल्याने मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी कोथिंबीर लागवड केली. मात्र सध्या तिचे दर घातलेला खर्च निघणारेही असल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. काढणीस आलेली अनेक फडे विक्रीविना तशीच आहेत. पंचेचाळीस दिवसांच्या पुढे हे पीक गेले की त्याला फुलोरा येतो. मग हा फुलोरा आलेला माल कोणीही खरेदी करीत नाही. अशा वेळी शेतकऱ्यांपुढे दोनच पर्याय असतात.

एक तर सरळ कुळव घालून पीक मोडणे, नाहीतर त्याचे बियाणे करणे. बियाणे तयार होण्याचा कालावधी हा नव्वद ते शंभर दिवसांचा असतो. त्यामुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी हे पीक तोडण्यापेक्षा त्याचे बियाणे करण्यावर भर दिला आहे. कास्ती भागातील गावरान बियाण्याला लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात चांगलीच मागणी असल्याने या बियाण्यातून चांगले पैसे मिळतात. एका एकरात चांगले पीक असेल तर ९०० किलो बियाणे तयार होते. हे बियाणे दोनशे ते तीनशे रुपये किलोपर्यंत विक्री होते. यामधून साधारणतः अडीच ते पावणेतीन लाख रुपये मिळतात. एकरी सरासरी झालेला एकूण खर्च पंचवीस ते तीस हजार वजा जाता दोन ते अडीच लाख रुपये शिल्लक राहत असल्याने गेली तर कोथिंबीर नाहीतर बियाणे या तत्त्वावर शेतकरी चालत आहेत.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coriander Get Low Price, Farmers Unhappy In Ausa Block Latur News