Corona Breaking ; परभणीचा आकडा हजाराला टेकला, दिवसभरात ८१ पॉझिटिव्ह 

गणेश पांडे
Saturday, 8 August 2020

जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात ८१ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. एकूण बाधित रुग्णांची संख्या ९९६ इतकी झाल्याने हा आकडा एक हजाराला टेकला आहे. 

परभणी ः जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात ८१ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. एकूण बाधित रुग्णांची संख्या ९९६ इतकी झाल्याने हा आकडा एक हजाराला टेकला आहे. आज एकही मृत्यु झाला नसल्याने परभणीकरांना दिलासा मिळाला आहे. यातील एकूण बरे झालेले रुग्ण ४४० इतके तर ५०८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने प्रेसनोटद्वारे दिली. 

परभणी शहरात शनिवारी घेण्यात आलेल्या रॅपिड एंटीजन टेस्टमध्ये १५ व्यापाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले. महापालिकेच्या वतीने शनिवारी सिटी क्लब व उदेश्वर विद्यालयात दिवसभरात २७२ व्यापाऱ्यांची रॅपीड अ‍ॅटीजन टेस्ट करण्यात आली. त्यात १५ व्यापारी पॉझिटिव्ह आले. आयुक्त देविदास पवार यांनी १५ ऑगस्टपर्यंत रॅपिड टेस्ट करून घेण्याच्या सूचना केल्यामुळे या टेस्टला मोठा प्रतिसाद मिळत असून दोन्ही केंद्रावर व्यापाऱ्यांच्या टेस्टसाठी रांगा लागत असल्याचे चित्र आहे. परंतू, प्रयोगशाळा तंत्रज्ञांची कमतरता असल्यामुळे या टेस्टमध्ये अडथळा निर्माण होत असल्याचे चित्र आहे. आरोग्य अधिकारी डॉ.कल्पना सावंत, नोडल अधिकारी अभिजीत कुलकर्णी, स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड, सहायक आयुत्त शिवाजी सरनाईक, सहायक आयुक्त संतोष वाघमारे व श्रीकांत कांबळे, मेहराज अहेमद, श्रीकांत कुऱ्हा, समन्वयक गजानन जाधव, जोगदंड, डॉ. प्रविण रेंगे, डॉ.आरती देऊळकर, डॉ.सुनिल उन्हाळे, डॉ.कलीमा बेग, डॉ.आयशा समरीन, रामेश्वर कुलकर्णी, अमोल काटुके, शितल मानवतकर आदी पुढाकार घेत आहेत. 

हेही वाचा - परभणीकरांच्या मदतीला ‘माझी हेल्थ, माझ्या हाती’ ॲप, कसे ते वाचाच...
 
परभणीत २०० खाटांचे कोविड सेंटर होणार 
परभणी : डॉ. प्रफुल्ल पाटील मल्टी सुपरस्पेशालिटी नॉनकोविड हॉस्पिटल परिसरात २०० खाटांचे खासगी कोविड व वरद गार्डन परिसरात शंभर खाटांचे पेड कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा संकल्प डॉ. प्रफुल्ल पाटील व डॉ. विद्या पाटील यांनी केला आहे. जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या पाहता कोविड व नॉनकोविड अशा दोन्ही रुग्णांना शासकीय व्यवस्था अपुरी पडत आहे. जिल्ह्याची गरज पाहून हे कॉर्पोरेट रुग्णालय खासगी सेवेच्या माध्यमातून इच्छुक रुग्णांसाठी स्वेच्छेने पर्याय असेल. जिल्हास्तरावर उभे होणारे हे सर्वांत मोठे खासगी कॉर्पोरेट रुग्णालय असेल. परभणीचे डॉ. प्रफुल्ल पाटील व भाजपच्या नगरसेविका डॉ. विद्या पाटील यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे व विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी., जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे सर्व प्रशासकीय पातळीवर चर्चा करून निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. डॉ.प्रफुल्ल पाटील मल्टी सुपरस्पेशालिटी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे सर्व सीईओ यांच्या सामूहिक संकल्पनेतून संपूर्ण जिल्ह्याला कोविड संकटात ही खासगी रुग्णालयाची उपलब्धी निर्माण केली आहे. जिल्ह्याच्या आरोग्यसेवेच्या दृष्टीने ही खूप मोठी उपलब्धी होत आहे. लवकरात लवकर हे रुग्णालय कार्यान्वित होण्याच्या दृष्टीने कॉर्पोरेट कंपनी, सर्वजण प्रयत्नशील आहेत. रॅपिड ॲंटीजेन टेस्टिंगची सुविधादेखील या ठिकाणी उपलब्ध करण्याचा संकल्प असल्याचे डॉ. पाटील यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे सांगितले आहे.

 

हेही वाचा - Corona Breaking ; हिंगोलीत एकाचा मृत्यू, दिवसभरात सात पॉझिटिव्ह

परभणी जिल्हा 
एकूण बाधित - ९९६
आजचे बाधित - ८१
आजचे मृत्यु - शून्य 
एकूण बरे - ४४०
उपचार सुरु असलेले - ५०८
एकूण मृत्यु - ४८

संपादन ः राजन मंगरुळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Breaking; Parbhani's number reached thousands, 81 positive in a day, Parbhani News