esakal | Corona Breaking ; परभणीत एकाच दिवशी सात कोरोना बाधित 
sakal

बोलून बातमी शोधा

corona

परभणीकरांनो आता खऱ्या अर्थाने सावधगिरी बाळगण्याची वेळ आली आहे. कारण गेल्या चार दिवसांपासून शहरात कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळून येत आहेत. 

Corona Breaking ; परभणीत एकाच दिवशी सात कोरोना बाधित 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

परभणी ः परभणीकरांनो आता खऱ्या अर्थाने सावधगिरी बाळगण्याची वेळ आली आहे. कारण गेल्या चार दिवसांपासून शहरात कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळून येत आहेत. शुक्रवारी (ता.तीन) एकाच दिवशी तब्बल सात रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा देखील खडबडून जागी झाली आहे. विशेष म्हणजे हे सहा रुग्ण शहरातील महत्त्वाच्या भागात आढळून आल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. 

शहरासह जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत गेल्या आठवडाभरापासून दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. शुक्रवारी (ता.तीन) सायंकाळी कोरोनाबाधित एकूण सहा रूग्ण आढळून आले आहेत. त्यात परभणी शहरातील नाथनगरमध्ये दोन, तर काद्राबाद प्लॉट, अजिजिया नगर, पंचशील नगर व विकास नगरमध्ये प्रत्येकी एक कोरोना विषाणुचा संसर्ग झालेला रुग्ण आढळून आला आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयातून नांदेड येथे स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या प्रयोगशाळेस संशयितांचे स्वॅब पाठविण्यात आले होते. शुक्रवारी दुपारपर्यंत त्या प्रयोग शाळेत एकूण ४८ स्वॅब प्रलंबित होते. सायंकाळी साडेचारच्या सुमारास ई-मेलद्वारे त्या स्वॅबचे अहवाल प्राप्त झाले आहे. यात सहा रुग्णांचे स्वॅब पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधित एकूण रुग्णांची संख्या १३० एवढी झाली आहे. आतापर्यंत एकूण चार मृत्यू झाले आहेत.

हेही वाचा - ग्राहकांकडून तक्रारींचा पाऊस, कशामुळे ते वाचा...

परभणीत संचारबंदीची कडक अंमलबजावणी 
परभणी ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात गुरुवारपासून (ता.दोन) लागू करण्यात आलेल्या संचारबंदीची अंमलबजावणी कडक करण्यात आली आहे. सहायक पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांच्यासह शहरातील तिन्ही पोलिस ठाण्यांचे पोलिस निरीक्षक व कर्मचारी लक्ष ठेवून आहेत. शहरात गुरुवारी (ता.दोन) कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले पाच रुग्ण आढळले आहेत. याआधी सलग तीन दिवसांपासून जिल्ह्यात व विशेषत: परभणी शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण आढळून आले आहेत. अचानक जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी परभणी शहरासह तालुक्याच्या ठिकाणी तीन दिवसांची संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे शहरात कुणालाही बाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. परभणी शहरात पहाटेपासूनच पोलिसांची गस्त सुरू झाली आहे. शहरातील वसमत, जिंतूर, गंगाखेड या रस्त्यांसह शहरातील सर्व प्रमुख चौक व इतर ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. परभणी शहराचे सहायक पोलिस अधीक्षक बगाटे यांनी सकाळी जिंतूर रस्त्यावरील वाहनांची तपासणी केली. यावेळी त्यांच्यासोबत नानलपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे उपस्थित होते. 

हेही वाचा - Video - परभणी शहरात संचारबंदीची कडक अंमलबजावणी सुरु

परभणीत तपासणीसाठी नाक्यांवर पथके तैनात 
परभणी : वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या दृष्टीने शहरात बाहेरून येणाऱ्या नागरिकांनी स्वतः होम क्वारंटाइन व्हावे अन्यथा गुन्हा दाखल करू, असा इशारा महापालिकेचे आयुक्त देविदास पवार यांनी दिला आहे. तसेच तपासणीसाठी नाक्यांवर पथके तैनात करण्यात आली आहेत. राज्यात तसेच शहरात टाळेबंदी झाल्यानंतर अनधिकृतपणे येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी होती. या मार्गाने आलेल्या अनेक नागरिकांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्या व्यक्तींमुळे त्यांच्या कुटुंबातील तसेच संपर्कातील अनेक जण संक्रमित झाले आहेत. या व्यक्तींना प्रतिबंध करण्याची गरज होती, त्यावेळेस मात्र ते करण्यात फारसे स्वारस्य यंत्रणेने दाखवले नव्हते. परंतु आता कोरोना समाजामध्ये संक्रमित होत असून दररोज कोरोना संक्रमित रुग्ण आढळून येत आहेत. प्रशासनाला वारंवार संचारबंदी लावावी लागत असून प्रतिबंधित क्षेत्रातही वाढ होत आहे.