esakal | COVID-19| आष्टीतील रुग्णवाढीत घट तर बीड, गेवराईमध्ये रुग्ण वाढले
sakal

बोलून बातमी शोधा

corona

COVID-19| आष्टीतील रुग्णवाढीत घट तर बीड, गेवराईमध्ये रुग्ण वाढले

sakal_logo
By
सकाळ वृ्त्तसेवा

बीड: जिल्ह्यात कोरोनाचे शेपूट लांबतच चालले असून रुग्णसंख्या कमी होण्याचे नाव घेत नाही. कोरोनाची दुसरी लाट सर्वत्र ओसरत असली तरी जिल्ह्यात महिनाभरापासून कोरोनाग्रस्तांचा दीडशे आणि कधी त्याहून अधिक असलेला आकडा कमी होण्याचे नाव घेत नाही. विशेष म्हणजे मागचे काही दिवस आष्टीमुळे जिल्ह्याचा नियमित कोरोना आकडा वाढलेला होता. परंतु, आता आष्टी थंडावल्यानंतर बीड व गेवराई तालुक्यांनी उचल खाल्ल्याने कोरोना पुन्हा पावणेदोनशेंच्या घरात आहे.

विशेष म्हणजे मंगळवारी (ता. १३) कोरोनाच्या पावणेदोनशे रुग्णांसह म्युकरमायकोसिस या काळ्या बुरशीच्या आजाराचेही चार नवीन रुग्ण वाढले. तर, सहा नवीन कोरोनाबळींची भर पडली. सोमवारी जिल्ह्यातील चार हजार ८१ लोकांच्या स्वॅब नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये १७५ कोरोनाग्रस्त आढळून आले. तर, तीन हजार ९०६ लोकांचे स्वॅब अहवाल निगेटिव्ह आले. काही दिवस आष्टीचा वाढता आकडा घटला. मंगळवारच्या बाधीतांमध्ये आष्टीचे रुग्ण २८ होते. मात्र, बीड तालुक्यात ४६ आणि गेवराई तालुक्यात ३६ नवीन रुग्णांची भर पडली.

हेही वाचा: आता राज्यातील विद्यार्थ्यांना इस्राईलमध्ये शिकण्याची संधी!

पाटोद्यातही तुलनेने अधिक संख्या आढळली. या तालुक्यात २० आणि शिरुरमध्येही १५ रुग्ण आढळले. अंबाजोगाई तालुक्यात दोन, परळीत एक आणि वडवणीत सहा तर धारुरमध्ये तीन रुग्ण आढळले. केज तालुक्यात १२ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ९३ हजार ९३७ इतकी कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. यापैकी ९० हजार १३९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या एक हजार २३४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. २४ तासांत सहा मृत्यूची नोंद आरोग्य विभागाच्या पोर्टलवर झाली.

हेही वाचा: 'महापालिका शाळेतील विद्यार्थांची संख्या वाढवा अन्यथा कारवाई'

थांबलेल्या ‘म्युकर’चाही पुन्हा झटका-
म्युकरमायकोसिस या काळ्या बुरशीमुळे होणाऱ्या आजाराच्या फैलावाला काहीसा ब्रेक लागला होता. आठवडाभरात रुग्णसंख्येत विशेष वाढ झाली नव्हती. मंगळवारी मात्र आणखी चार रुग्णांची भर पडली. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या १९७ इतकी झाली आहे. यापैकी ७८ रुग्णांवर अंबाजोगाईच्या स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात विविध शस्त्रक्रिया व उपचारानंतर बरे झाले आहेत. तर याच ठिकाणी आणखी ६९ रुग्ण उपचार घेत आहेत. चार रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ३४ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

loading image