esakal | चिंताजनक! बीडमध्ये प्रतिदिन कोरोना रुग्णसंख्या दोनशेच्या घरात
sakal

बोलून बातमी शोधा

beed

चिंताजनक! बीडमध्ये प्रतिदिन कोरोना रुग्णसंख्या दोनशेच्या घरात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बीड: कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा कहर ओसरत असला तरी जिल्ह्यात वाढती रुग्णसंख्या कायम आहे. मागील तीन दिवसांत पॉझिटिव्हिटी रेटही हळूहळू वाढत आहे. बुधवारी (ता. सात) १८८ नवीन रुग्णांची नोंद झाली. तपासण्यांच्या तुलनेत रुग्ण आढळण्याचे प्रमाण ४.८९ टक्के होते. म्युकरमायकोसिस आजाराच्या रुग्णांच्या बाबतीत दोन दिवसांत दिलासादायक चित्र आहे. नव्याने रुग्णांची तसेच मृत्यूंमध्ये कुठलीही वाढ झाली नाही. मंगळवारी तीन हजार ८४२ लोकांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. याचे अहवाल बुधवारी दुपारी प्राप्त झाले. यात १८८ पॉझिटिव्ह तर तीन हजार ६५४ जण निगेटिव्ह आले.

तपासण्यांची संख्या वाढताच रुग्ण वाढत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे तीन दिवसांत अडीच टक्क्यांवरून पाच टक्क्यांपर्यंत पॉझिटिव्हिटी रेट वाढला आहे. बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात १३, आष्टी ४६, बीड ३१, धारुर सात, गेवराई ४५, केज १०, माजलगाव सहा, परळी दोन, पाटोदा २१, शिरुर सहा व वडवणी तालुक्यातील एक रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधितांची संख्या ९२ हजार ९४३ इतकी झाली असून यापैकी ८९ हजार ३५८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या एक हजार ३८ रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती साथरोग जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी. के. पिंगळे यांनी दिली. दरम्यान, तीन नवीन कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूसह एकूण मृत्यूसंख्या २ हजार ५४७ इतकी झाली.

हेही वाचा: भागवत कराड! केंद्रीय मंत्रीपदापर्यंतचा प्रवास आश्चर्यचकित करणारा

म्युकरचे आतापर्यंत १९२ रुग्ण
दोन दिवसांत काळ्या बुरशीमुळे होणाऱ्या म्युकरमायकोसिस आजाराच्या नवीन रुग्णांमध्ये आणि मृत्यूंमध्ये वाढ झाली नाही. आतापर्यंत १९२ रुग्णांची नोंद झाली असून ७५ रुग्णांवर अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तर एका रुग्णावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. तर, आतापर्यंत ७१ रुग्णांना उपचारानंतर सुटी दिली आहे. ३३ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

loading image