esakal | परभणीतील विघ्नहर्त्यांच्या मुर्तिकारांवर कोरोनाचे विघ्न, जिल्ह्यात एक कोटीचा फटका
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

कारण यंदा मुर्तीशाळामधून गणेश मुर्त्यांची निर्मिती अत्यंत संथ गतीने होत आहे. टाळेबंदीमुळे बसलेला फटका व त्यात गणेश मुर्तीच्या उंचीसाठी राज्यशासनाने घालून दिलेल्या नियमांमुळे परभणी जिल्ह्यातील मुर्तीशाळा चालकांना तब्बल १ कोटी रुपयांचा फटका बसला आहे.

परभणीतील विघ्नहर्त्यांच्या मुर्तिकारांवर कोरोनाचे विघ्न, जिल्ह्यात एक कोटीचा फटका

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी : विघ्नहर्त्या गणेशाच्या आगमनाचा मुहूर्त अवघ्या काही दिवसावरच आला आहे. परंतू यंदाचा गणेशोत्सव कोरोनाच्या गर्द काळ्या छायेच्या सावटाखाली साजरा होण्याची चिन्हे दिसत आहेत. कारण यंदा मुर्तीशाळामधून गणेश मुर्त्यांची निर्मिती अत्यंत संथ गतीने होत आहे. टाळेबंदीमुळे बसलेला फटका व त्यात गणेश मुर्तीच्या उंचीसाठी राज्यशासनाने घालून दिलेल्या नियमांमुळे परभणी जिल्ह्यातील मुर्तीशाळा चालकांना तब्बल १ कोटी रुपयांचा फटका बसला आहे.

परभणी शहरासह संपूर्ण जिल्ह्यात २०० च्या जवळपास मुर्तीशाळा आहेत. या मुर्तीशाळामधून हजारो मुर्तीकार व त्यांना सहायक म्हणून काम करणारे कामगार काम करतात. एकट्या परभणी शहरात आज घडीला ८० मुर्तीशाळा अस्थित्वात आहेत. परंतू या मुर्तीशाळा चालकांसमोर यंदा कोरोनाचे महासंकट उभे राहिले आहे. मुर्ती करण्यासाठी लागणारे साहित्य टाळेबंदीमुळे मिळालेले नसल्याने आहे त्या किंवा परभणीच्या बाजारपेठे जे उपलब्ध झाले त्याच साहित्यावर मुर्तीकलेचे काम सुरु आहे. त्यामुळे मुर्तीशाळामधून मुर्ती बनविण्याचे काम अत्यंत संथ गतीने होत आहे. याचा परिणाम आकर्षक व विविध आकाराच्या मुर्ती बनविणाऱ्यावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा -  लेंडी प्रकल्पाचे खरे जनक देवेंद्र फडणवीस- कोण म्हणाले वाचा...?

राज्यातील चार हबमध्ये परभणी

राज्यात मुर्तीकलेचे काम विविध ठिकाणी केले जाते. परंतू विभाग निहाय मुर्तीकलेचे व त्या ठिकाणी असलेल्या मुर्तीशाळांचे वेगळे हब तयार आहे. त्यात मुंबईसह कोकण विभागासाठी पेण, पश्चिम महाराष्ट्रासाठी अहमदनगर, विदर्भासाठी अमरावाती तर मराठवाड्यातील जिल्ह्यासाठी परभणी हे मुर्तीकारांचे मोठे ठिकाण म्हणून ओळखले जाते. त्यामुळे संपूर्ण मराठवाडा व लगतच्या आध्रप्रदेशातील बोधन, निझामाबाद, करीमनगर, म्हैसा व कामारेड्डी या जिल्हयातीह परभणीच्या गणेशमुर्तींना दरवर्षी मोठी मागणी असते.

प्लॉस्टरबंदीमुळे मोठ्या मुर्तींचे काय ?

सहसा मोठ्या गणेश मुर्ती तयार करण्याचे काम नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीत सुरु होते. यंदाही जिल्ह्यातील बहुतांश मुर्तीकारांनी मोठ्या व ऑर्डरच्या मुर्त्या तयार केल्या आहेत. परंतू राज्य शासनाने फेब्रुवारी महिण्यात राज्यात प्लॉस्टर ऑफ पॅरिसच्या मुर्तींना बंदी आणल्यामुळे या मुर्त्यांचे आता पुढे काय ? हा प्रश्न मुर्तीकारांना पडला आहे. दरवर्षी प्लॉस्टरच्या गणेश मुर्ती तयार करण्यासाठी परभणी जिल्ह्यात २५ ते ३० ट्रक प्लॉस्टर मागविले जाते. तो मालही आता मुर्तीकारांच्या घरातच पडून आहे.

अनेक कामगारांचा रोजगार सुटला

मुर्तीकलेचे काम दरवर्षी डिसेंबर महिण्यापासून सुरु होते. ते गणेशोत्सव सुरु होण्यापर्यत चालते. वर्षातील सहा - सात महिणे या कामगारांच्या हाताला काम असते.परंतू यंदा मुर्तीशाळामध्ये मुर्ती बनविण्यासाठी साहित्य नसल्याने मुर्तीशाळा चालकांनी कामगारांनाही बोलवले नाही. दरवर्षी एका मुर्तीशाळेत २० ते २५ कामगारांच्या हाताला काम असायचे आता ते काम चार ते पाच जणांवर भागविले जात आहे.

येथे क्लिक कराMotivational: मारो छाय मारो स्वप्न पुरु करो- कोण म्हणाले ते वाचा...?

यंदा मुर्तीचे दर वाढतील

यंदा टाळेबंदीमुळे मुर्ती तयार करण्यासाठी लागणारे साहित्य मिळालेलेच नाही. आहे त्या साहित्यात मुर्ती बनविण्यात येत आहेत. जे साहित्य मिळते ते चढ्या भावाने विकत घ्यावे लागत आहे. त्यामुळे यंदा गणेश मुर्तींचे दर २५ ते ३० टक्क्यांनी वाढू शकतात.
- विनायक मिसाळ, मुर्तीशाळा चालक, परभणी

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image