कोरोना इफेक्ट- दोन लाखाची घरफोडी 

प्रल्हाद कांबळे
Tuesday, 31 March 2020

कपाटातील सोन्या- चांदीचे दागिणे व रोख असा एक लाख ९२ हजार २८२ रुपयाचा ऐवज लंपास केला.

नांदेड : कोरोना या जीवघेण्या व्हायरसच्या भितीने कुटुंबासह राहण्यासाठी शेतात गेलेल्या एका शेतकऱ्याचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडले. कपाटातील सोन्या- चांदीचे दागिणे व रोख असा एक लाख ९२ हजार २८२ रुपयाचा ऐवज लंपास केला. ही घटना जवळा देशमुख (ता. लोहा) येथे रविवारी (ता. २९) रात्री घडली. 

लोहा तालुक्यातील जवळा देशमुख येथील पंडीत रामजी तिडके (वय ४५) यांनी आपल्या परिवाराला सोबत घेऊन आपल्या शेतावर राहण्यासाठी गेले होते. सध्या जगात व देशात तसेच राज्यात कोरोना या महाभयंकर आजाराने थैमान घातला आहे. त्यामुळे शहरासह ग्रामिण भागातही नागरिक घरातून बाहेर पडत नाहीत. तर काही ठिकाणी नागरिकांनी लोकांमध्ये मिसळण्यापेक्षा आपले कुटुंब घेऊन शेतावर राहण्यास जात आहेत. हा महाभयंकर आजार आपल्या परिवाराला होऊ नये याची पुरेपुर काळजी नागरिक घेत आहेत. 

हेही वाचानात्याचं अस्तीत्वच येत आहे संपुष्टात, कसे? ते वाचाच

एक लाख ९२ हजार २८२ रुपयाचा ऐवज लंपास

असेच एक पंडीत तिडके यांचे कुटुंब गावशेजारी असलेल्या त्यांच्याच शेतात राहण्यासाठी गेले होते. घराला कुलूप दिसल्याने अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. कपाट फोडून आतील डब्यात सोन्या- चांदीचे दागिणे व नगदी असा एक लाख ९२ हजार २८२ रुपयाचा ऐवज लंपास केला. ही बाब सोमवारी (ता. ३०) पंडीत तिडके आपल्या घरी गेले असता आपल्या घरी चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी घरात प्रवेश करुन पाहिले तर चोरट्यांनी पुर्ण घर साफ केले होते. 

सोनखेड पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा 

पंडीत तिडके यांनी लगेच सोनखेड पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधाकर आडे हे आपल्या पथकासह जवळा देशमुख येथे पोहचले. त्यांनी घटनेचा पंचनामा केला. मात्र चोरट्यांनी कुठलाच माग मागे न ठेवल्याने पोलिसांना काहीच सुगावा लागला नाही. अखेर पंडीत तिडके यांच्या फिर्यादीवरुन सोनखेड पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधाकर आडे करत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Effect - Two lakh burglary nanded news