बीड - कोरोनाचा बाजारपेठेवर परिणाम, कापड दुकाने बंद 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 20 March 2020

सध्या कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून ग्राहक वस्तू खरेदी करण टाळत आहेत. त्यामुळे ग्राहकांची संख्या सध्या कमी झालेली आहे. प्रशासनाने काळजी घेण्याचे आवाहन केल्यामुळे लोकांनी घरात राहणेच पसंत केले आहे. 

वडवणी (जि. बीड) - कोरोनामुळे वडवणीच्या बाजारपेठेत शुकशुकाट पाहायला मिळत आहे. गजबजून केलेली बाजारपेठ सध्या सामसूम झाली असून, दैनंदिन व्यवहारावरही परिणाम झाल्याचे चित्र दिसत आहे.

सध्या लग्नसमारंभ होत नाहीत. नगर पंचायतीने पाचपेक्षा अधिक ग्राहकांना दुकानात घेऊ नये, असे आवाहन केले आहे. त्यामुळे बाजारपेठेत लोकांची वर्दळ कमी झाली आहे. प्रशासनाने काळजी घेण्याचे आवाहन केल्यामुळे लोकांनी घरात राहणेच पसंत केले आहे. परिणामी, शहरातील कापड व्यवसायासह इतर व्यापारीवर्गावर परिणाम होत आहे. 

हेही वाचा - कोरोना इफेक्ट - साखरपुड्यात विवाह उरकून एक लाख दिले मुख्यमंत्री निधीत

व्यापारी सिद्धेश्वर लंगे म्हणाले, की  सध्या कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून ग्राहक वस्तू खरेदी करण टाळत आहेत. त्यामुळे ग्राहकांची संख्या सध्या कमी झालेली आहे. 
कापड दुकानदार विश्वास असलकर म्हणाले, की  प्रशासनाला सहकार्य करण्याच्या हेतूने व कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी आम्ही आमचे दुकान आजपासून तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

पिग्मीचे ग्राहक झाले कमी 
सध्या बाजारपेठेत शुकशुकाट असल्याने पतसंस्था तसेच मल्टिस्टेट बँकांच्या पिग्मी एजंटचे ग्राहक कमी होऊ लागले आहेत. शहरात जवळपास चाळीसजण विविध खासगी बँकांचे पिग्मी एजंट म्हणून कमिशनवर काम करतात; मात्र शहरातील बाजारपेठेत ग्राहकांनी पाठ फिरवल्यामुळे खेळते पैसे बंद झाले आहे. काही व्यापाऱ्यांची दुपारपर्यंत बोहणीच होत नसल्यामुळे पिग्मी भरणे बंद केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona - Impact on the market, textile shops closed