कोरोना इफेक्ट - साखरपुड्यात विवाह उरकून एक लाख दिले मुख्यमंत्री निधीत

सकाळ वृत्तसेवा
Monday, 16 March 2020

सध्या कोरोना विषाणूचा प्रसार वाढत आहे. त्यामुळे सामाजिक, राजकीय, यात्रा अशा कार्यक्रमांना प्रशासनानेच पायबंद घातला आहे. आता नागरिकही काळजी घेत असून, बीड जिल्ह्यात साखरपुड्यातच विवाह लावून खर्च टळल्याने एक लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला देण्यात आले.

बीड -कोरोना विषाणूच्या प्रसाराची सर्वाधिक शक्यता ही गर्दीमुळेच असून, गर्दी रोखण्यासाठी प्रशासन विविध पावले उचलीत असताना आता समाजाचे विविध घटकदेखील त्याला प्रतिसाद देत आहेत. याचाच भाग म्हणून रविवारी (ता. १५) साखरपुड्यातच विवाह उरकून लग्नाचा खर्च टळल्याने एक लाख रुपये आंधळे कुटुंबीयांनी मुख्यमंत्री सहायता निधीला दिले. 

सोमवारी (ता. १६) माजी आमदार केशव आंधळे यांनी या मदतीचा धनादेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना सुपूर्द केला. कोरोनाच्या उपचारासाठी ही रक्कम देण्यात आली. केशव आंधळे यांचे पुतणे आणि शंकरराव आंधळे यांचे चिरंजीव मयूर आंधळे यांचा विवाह समारंभ य रविवारी शिरूर कासार येथील त्र्यंबक खेडकर यांची कन्या अमृता हिच्यासोबत होता.

हेही वाचा - कोंबड्यांमध्ये खरंच कोरोना विषाणू आहे का? नॉनव्हेजवाल्यानो, वाचा...

सध्या कोरोना विषाणूचा प्रसार वाढत आहे. त्यामुळे सामाजिक, राजकीय, यात्रा अशा कार्यक्रमांना प्रशासनानेच पायबंद घातला आहे. तर विवाह सोहळ्यांनादेखील गर्दी टाळण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले होते. त्यामुळे या कुटुंबाने देखील साखरपुड्यातच मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत विवाह उरकला. लग्नाचा खर्च आणि गर्दी टाळली. त्याचे एक लाख रुपये कोरोना उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One lakh rupees CM fund