‘स्वारातीम’ विद्यापीठात कोरोना प्रयोगशाळा सुरू

pryogshala.jpg
pryogshala.jpg

नवीन नांदेड ः स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील इंक्युबेशन केंद्रामध्ये कोरोना संसर्ग लाळ तपासणी प्रयोगशाळा बुधवारपासून (ता. २२) सुरू करण्यात आली आहे. या प्रयोगशाळेस केंद्र सरकारच्या राष्ट्रीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून (आयसीएमआर) नुकतीच मान्यता प्राप्त झाली आहे.

पाचशे नमुन्यांच्या तपासण्या केल्या जाणार
दिवसेंदिवस कोरोनाचा प्रसार वाढत आहे. या आजारांमध्ये लवकरात लवकर रुग्णांचे स्वॅबचे नमुने तपासण्यासाठी आणि तत्परतेने इलाज करण्यासाठी ही प्रयोगशाळा तयार करण्यात आली आहे. यापूर्वी नांदेड आणि आसपासच्या जिल्ह्यांतील रुग्णांच्या लाळेचे नमुने पुणे आणि औरंगाबाद येथे तपासणीसाठी पाठविण्यात येत होते. आता यानंतर येथे ही सुविधा उपलब्ध केल्यामुळे अगदी काही तासांत निकाल मिळणार आहे. या प्रयोगशाळेमध्ये प्रतिदिन जवळपास पाचशे नमुन्यांच्या तपासण्या केल्या जाणार आहेत. या प्रयोगशाळेमध्ये जनुकीय मटेरियलद्वारे व्हायरसचे निदान होणार आहे. प्रयोगशाळेसाठी लागणारे अत्याधुनिक उपकरण रियल टाईम पीसीआर उपलब्ध आहे.

कोरोना हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून या प्रयोगशाळेचा शंभर मीटर अंतरापर्यंत कुणीही येणार नाही यासाठीची पूर्ण उपाययोजना करण्यात येणार आहे. इथे फक्त पूर्ण सुरक्षित कपड्यामध्ये प्रशिक्षित कर्मचाऱ्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. या प्रयोगशाळेमुळे मराठवाड्यातील आणि आजूबाजूच्या राज्यांतील जिल्ह्यांना मोठा फायदा होणार आहे. या प्रयोगशाळेच्या उभारणीसाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली नवोपक्रम, नवसंशोधन आणि सहचर्य मंडळाचे संचालक डॉ. राजाराम माने, रुसा हर्बोमेडिसिन सेंटरचे समन्वयक डॉ. शैलेश वाढेर, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, डॉ. जी. बी. झोरे, डॉ. मनमोहन बजाज, संदीप काळे यांच्यासह त्यांची सर्व टीम परिश्रम घेत आहेत.

लोकप्रतिनिधींनी केले विशेष प्रयत्न
सदर प्रयोगशाळा नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये सुरू करण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह खासदार प्रताप पाटील चिखलीकर, खासदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार मोहन हंबर्डे आदींनी विशेष प्रयत्न आणि पाठपुरावा केला. त्याचबरोबर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले आणि जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्या परिश्रमातून महाराष्ट्रातील पहिल्या अकृषी विद्यापीठामध्ये प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी यश प्राप्त झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com