अन्नधान्य संपले; पण दारू काही संपेना !

साजिद खान
Wednesday, 22 April 2020


जिल्हा प्रशासनाने लॉकडाउनमुळे सर्वसामान्यांना जीवनावश्यक गरजापूर्ण करण्यासाठी वेगळ्या संकटाचा सामना करण्याची गरज येऊ नये या दृष्टिकोनातून दररोज नवनवीन परिपत्रक काढून काय बंद आणि काय चालू या स्वरूपाचे नियोजन करीत आहेत. दारूविक्रीला तर प्रथम प्राधान्याने हद्दपार करण्यात आले. परंतु, तेवढ्याच वेगवान पद्धतीने दारू विक्रीचा व्यवसाय वाई बाजार परिसरात सुरू आहे.

वाई बाजार, (ता.माहूर, जि. नांदेड) ः संचारबंदी लागल्यापासून घरात साठवून ठेवलेला धान्यसाठा महिनाभर पुरला. आता मात्र दोन वेळा चूल पेटविण्याची सोय होत नाही. किरकोळ विक्री किराणा दुकानधरकांकडील शिल्लक अन्नधान्य व आवश्यक वस्तू संपत असल्याने आहे त्या मालाचे भाव आभाळाला टेकले. अशात गरीब कुटुंबांना ते घेऊन उपजीविका भागविणे दुरापास्त बनले आहे. परंतु, मद्य शौकीन घरधनी दररोज संध्याकाळी दारू पिऊन येत असल्याने खायला अन्न मिळणं झालाया... दुकानदार म्हणतोय डाळ-दाणा संपलाय... दारू मात्र कशी संपत नाही. हे उमजणे महिला वर्गाला कठीण बनले असून स्वतःजवळील आभूषणे विकून, मोलमजुरी करून येणाऱ्या संकट काळासाठी जमविलेला हातातील पैका नवरा दारूच्या व्यसनापायी खर्च करत असल्याने उपाशीपोटी राहून येत्या काळात भुकमारीने मरावे लागेल. अशा चिंतातूर प्रतिक्रिया महिला मंडळातील येत आहे.

हेही वाचा -  पोटाची खळगी... त्यांना सीमा पार करून नेली !

 

जिल्हा प्रशासनाने लॉकडाउनमुळे सर्वसामान्यांना जीवनावश्यक गरजापूर्ण करण्यासाठी वेगळ्या संकटाचा सामना करण्याची गरज येऊ नये या दृष्टिकोनातून दररोज नवनवीन परिपत्रक काढून काय बंद आणि काय चालू या स्वरूपाचे नियोजन करीत आहेत. दारूविक्रीला तर प्रथम प्राधान्याने हद्दपार करण्यात आले. परंतु, तेवढ्याच वेगवान पद्धतीने दारू विक्रीचा व्यवसाय वाई बाजार परिसरात सुरू आहे. संचारबंदी काळातील दारूबंदीचा सर्वाधिक फायदा ग्रामीण भागातील दारू विक्रेत्यांनी घेतल्याचे चित्र ग्रामीण भागांमध्ये पाहायला मिळत आहे. अंदाजे साठ रुपये किंमत असलेल्या देशी दारूच्या बाटलीची किंमत १७५ ते २०० रुपये, तर पंधराशे रुपये किमतीला मिळणारे विस्कीचे युनिट तीन हजार ते पाच हजार रुपयांपर्यंत विक्री केली जात आहे. देशी दारू दुकान परवानाधारक विक्रेते व बार मालकांनी दारूच्या किमतीत भरमसाठ वाढ केल्याने गूळ, मोहापासून माळरानात हातभट्टीची दारू बनविणारेदेखील मागे राहिले नाहीत. दहा रुपयांप्रमाणे एक ग्लास दारू विकणारा आता शंभर रुपये घेत आहेत.

मोहाची दारू निर्मिती करणे सहज सोपे
वाई बाजार व दारू विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या आसपासच्या खेडेगावांत बेसुमार देशी आणि मोहाच्या हातभट्टीची दारू विक्री होत आहे. मोहाची दारू निर्मिती करणे सहज सोपे आहे. मात्र, कंपनीची बॅच नंबर असलेली दारू जिल्ह्याची सीमा बंद असताना लॉकडाउन काळात एवढ्या मोठ्या प्रमाणात कशी पुरविली जात आहे, हे अनाकलनीय आहे. एवढेच काय तर वाई बाजार परिसरात काही दिवसांपूर्वी देशी दारूची मोठी खेप विदर्भातून उतरल्याची चर्चा आहे आणि तोच पुरवठा आता पोचविला जात असल्याची प्रतिक्रिया दस्तूरखुद्द मद्यपी बोलून दाखवित आहेत.

लोकसंख्येचा गाडा मोजक्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या बळावर
जमावबंदी काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी पोलिस विभागाची आहे. परंतु, वाई बाजार पासून १३ किलोमीटर अंतरावर असलेले सिंदखेड पोलिस ठाणे ५२ गावांतील हजारो लोकसंख्येचा गाडा मोजक्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या बळावर उत्तमरीत्या सांभाळत आहे. दारू विक्रेत्यांवर कार्यवाही करण्याची राजपत्रित जबाबदारी राज्य उत्पादन शुल्क विभागाची आहे. विभागातील कर्मचाऱ्यांना दारू विक्री करणाऱ्यांची माहिती माहीत असूनदेखील किनवटला बसून माहूर तालुक्याचा कारभार हाकत आहे. त्यातल्या त्यात वाई बाजार परिसर जणू राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नकाशातच नाही, असे वाटत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The food is gone; But alcohol is not over!, nanded news