esakal | कोरोनाचे सावट : सहकाऱ्याची गुढी उभारा- एसपी विजयकुमार
sakal

बोलून बातमी शोधा

फोटो

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सहकाऱ्याची गुढी उभारा : पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांचे जनतेला आवाहन

कोरोनाचे सावट : सहकाऱ्याची गुढी उभारा- एसपी विजयकुमार

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : कोरोना या जीवघेण्या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात मंगळवारी (ता. २४) च्या मध्यरात्रीपासून लॉकडाऊन करण्यात आले आहे. जनतेनी लॉकडाऊनच्या काळात पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे. कोणीही घराबाहेर निघू नये. हिंदू नव वर्षाचा बुधवारी (ता. २५) पहिला दिवस अर्थात गुढीपाडवा आहे. गुढीपाडव्यानिमित्त सहकाऱ्याची गुढी उभारून कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आणि कोरोनाच्या महामारीवर मात करण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी केले आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संबध जग हैरान झाले आहे. हा जीवघेणा आजार भारतभर सुद्धा पसरला असून राज्यातही १०३ हून अधिक कोरोना बाधित रुग्णांची संख्या झाली आहे. सुदैवाने नांदेड जिल्ह्यात कोरोनाचा एकही पॉझीटीव्ह रुग्ण आढळला नसला तरी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून देशभरात लागू करण्यात आलेला लॉकडाऊन नांदेडमध्येही लागू करण्यात आला आहे. ता. १४ एप्रीलपर्यंत एकवीस दिवस चालणाऱ्या लॉकडाऊनमध्ये कोणत्याही नागरिकांनी घराबाहेर पडू नये. या काळात आपण घरातच राहावे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा Video : नांदेडकरांनो सावधान, जिल्ह्यात १४४ कलम लागू- जिल्हाधिकारी डॉ. विपीन

कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी आपण प्रार्थनेची गुढी उभारुया

लॉकडाऊनच्या कळात सर्व वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन करतानाच हिंदू नव वर्षाचा आज पहिला दिवस अर्थात गुढीपाडवा आहे. भारतीय संस्कृतीनुसार गुढीपाडव्याच्या दिवशी आपण गुढी उभारून सर्वांच्या सुख, समृद्धी आणि भरभराटीची प्रार्थना करत असतो. आरोग्यमय जीवनाची इच्छा ईश्वरापुढे व्यक्त करत असतो. त्यानुसार भारतावर आणि जगावर आलेले कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी आपण प्रार्थनेची गुढी उभारूया. 

जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनाला सहकार्य करा

त्यासोबतच जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनाला सहकार्य करण्याची गुढी उभारून कोरोनावर मात करण्यासाठी कटिबद्ध होऊया असे आवाहन पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी केले आहे. दरम्यान नांदेड जिल्ह्यातील सर्व जनतेला गुढीपाडव्यानिमित्त पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी शुभेच्छा दिल्या. पुन्हा एकदा नागरिकांना त्यांनी आवाहन केले की, फारच गरज असेल तर घराबाहेर तोंडाला मास्क लावून पडावे अन्यथा पडू नये.