जालन्यात कोरोनावर सोळा जणांची मात 

महेश गायकवाड
रविवार, 28 जून 2020

जिल्ह्यात कोरोनाने आता मोठ्या गतीने पाय पसरवायला सुरवात केली आहे. शुक्रवारी ४० रुग्णांची भर पडलेली असताना शनिवारी (ता.२७) पुन्हा १५ संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान, कोविड हॉस्पिटलमधील १६ जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

जालना - शहर व जिल्ह्यात कोरोनाने आता मोठ्या गतीने पाय पसरवायला सुरवात केली आहे. शुक्रवारी ४० रुग्णांची भर पडलेली असताना शनिवारी (ता.२७) पुन्हा १५ संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान, कोविड हॉस्पिटलमधील १६ जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४६२ रुग्ण आढळून आले असून त्यापैकी ३१७ बरे झाले आहेत. सध्या रुग्णालयात १३२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

पावसाळा सुरू झाल्यापासून जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. जालना शहरासह ग्रामीण भागातही आता कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्याने संपूर्ण जिल्ह्याची चिंता वाढली आहे. शनिवारी जिल्ह्यात दिवसभरात १५ रुग्णांची भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४६२ वर पोचली आहे. नव्याने आढळलेल्ल्या रुग्णांमध्ये जालना शहरातील बगडियानगर, बागवान मशीद परिसर येथील प्रत्येकी एक, जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील १२ व भोकरदन शहरातील रोकडा हनुमान परिसरातील एका व्यक्तीचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली आहे. 

हेही वाचा : कोरोनाबाधिताच्या अंत्यविधीला तब्बल शंभर जण

टेंभुर्णी येथील तब्बल ७५ जण कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आले होते. त्यामुळे अनेकांची चिंता वाढली होती. जिल्हा रुग्णालयातर्फे या सर्वांच्या लाळेचे नमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविले होते. त्यापैकी बारा व्यक्तींचा अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आल्याने टेंभुर्णीत खळबळ उडाली आहे. तर शहरातील पुन्हा दोन नव्या भागांत दोन रुग्ण आढळल्याने नागरिकांना आता खबरदारी बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.

हेही वाचा : पीककर्जावर शेतकऱ्यांची मदार

गेल्या आठवड्यापासून शहरात रोज नव्या ठिकाणी कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्याने आरोग्य यंत्रणेची मोठी धावपळ होत आहे. कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या १६ जणांनी शनिवारी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. बरे झालेल्या रुग्णांमध्ये जालना शहरातील खडकपुरा भागातील सहा, सुवर्णकारनगर परिसरातील चार, मंगळबाजार, खरपुडी नाका, जिल्हाधिकारी कार्यालय व बडी सडक येथील प्रत्येकी एक व भोकरदन शहरातील दोन व्यक्तींचा समावेश आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona report negative in Jalna