पीककर्जावर शेतकऱ्यांची सारी मदार 

आनंद इंदानी 
Wednesday, 20 May 2020

यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनची परिस्थिती असल्याने शेतकऱ्यांच्या तयार मालाला बाजारपेठच मिळाली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना आपला माल स्थानिक पातळीवर बेभाव विक्री करावा लागला, काही शेतकऱ्यांचा माल तर विक्रीअभावी सडून गेला. त्यात पुन्हा बेमोसमी आणि गारपिटीने कहर माजविल्याने शेतकरी पुरता कोलमडला आहे.

बदनापूर (जि.जालना) -  तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागे मागील दोन वर्षांपासून संकटांचे शुक्लकाष्ठ सुरूच आहे. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनची परिस्थिती असल्याने शेतकऱ्यांच्या तयार मालाला बाजारपेठच मिळाली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना आपला माल स्थानिक पातळीवर बेभाव विक्री करावा लागला, काही शेतकऱ्यांचा माल तर विक्रीअभावी सडून गेला. त्यात पुन्हा बेमोसमी आणि गारपिटीने कहर माजविल्याने शेतकरी पुरता कोलमडला आहे. सध्या तोंडावर खरीप पेरणी आली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना बियाणे आणि खते खरेदीसाठी पैशांची नितांत आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने बँकांमार्फत पीककर्ज वाटपाची कार्यवाही सुरू करावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. 

बदनापूर तालुक्यात मागील दोन वर्षांपासून निसर्गाने धोका दिला आहे. मागच्या वर्षी संपूर्ण पावसाळ्यात पाऊस झाला नाही. त्यामुळे खरीप पिकांची वाढ खुंटली होती. त्यात अमेरिकन लष्कर अळी व इतर रोगांनी थैमान माजविल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न तर सोडाच पिकांवरील खर्चही काढता आला नाही. कसेबसे नगदी पीक कापूस या आपत्तीत उभे होते. मात्र भर दिवाळीत पावसाने पिकांचा घात केला. अर्थात दिवाळीत सलग महिनाभर झालेल्या पावसाने जलसाठे व विहिरींना नवसंजीवनी मिळाली खरी त्यात रब्बी पिके डोलू लागली शिवाय पाण्याअभावी सुकू लागलेल्या फळबागांनाही आधार मिळाला. त्यामुळे किमान या आधारावर तरी शेतकऱ्यांच्या गाठीला चार पैसे उरतील अशी अपेक्षा असताना नियतीला हेही मान्य नव्हते असे म्हणावे लागेल.

हेही वाचा :  जालन्यातील शेतकऱ्यांना घरपोच खते 

अवघ्या राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउन जाहीर करण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाला विकण्यासाठी बाजारपेठ मिळाली नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी मिळेल त्या अशा कमी भावात आपला माल स्थानिक पातळीवर विकला. तर अनेक शेतकऱ्यांचे माल गळून पडल्याने सडले. एकूणच शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागेल. त्यात पुन्हा वादळीवाऱ्यासह गारपीट झाल्याने शेतकऱ्यांनी साठवलेला माल पुरता भिजला. तर फळगळ होऊन बागायतदार शेतकऱ्यांवर आर्थिक आरिष्ट्य कोसळले. लॉकडाउनच्या काळात शेतकऱ्यांनी होता नव्हता तेवढा पैसा खर्च करून खरीप पेरणीसाठी शेतमशागत करून ठेवली आहे. त्यामुळे शेतकरी सध्या आर्थिक अडचणीत आहेत. त्यात अवघ्या काही दिवसांत पावसाळा सुरू होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना खरीप पेरणीसाठी करावा लागणाऱ्या खर्चाची चिंता सतावत आहे. दरवर्षी एप्रिल महिन्यापासून शेतकऱ्यांना बँकांच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या पीककर्ज वाटपाला सुरवात होते. मात्र अद्याप कोणत्याही बँकेत पिककर्जाची प्रक्रिया सुरू झालेली नाही. त्यामुळे पेरणीच्या काळात पीककर्ज मिळेल का? बियाणे आणि खते खरेदीसाठी पैसा हातात राहील का? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

हेही वाचा : सकारात्मक राहा... हेही दिवस निघून जातील 

कोरोनामुळे अवघ्या देशात व राज्यात आर्थिक संकट उभे राहिले आहे. मात्र भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या कृषिक्षेत्राला बळ देण्याची जबाबदारीही सरकारची आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खरीप पेरणी करण्यासाठी तातडीने राष्ट्रीयकृत, ग्रामिण व सहकारी बँकेमार्फत पीककर्ज देण्याची कार्यवाही सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे. 

नैसर्गिक आपत्ती आणि कोरोनाच्या संकटात कृषिक्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या गाठीला पैसाच शिल्लक राहिलेला नाही. त्यात खरीप पेरणी तोंडावर आली आहे. त्यामुळे पेरणीसाठी लागणार खर्च करण्यासाठी पैसा कुठून मिळेल? अशी चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. दरवर्षी एप्रिल महिन्यातच बँकांमार्फत पीककर्ज मिळते, त्यात पेरणीचा खर्च भागतो. मात्र यंदा मे महिन्याचा पंधरवडा लोटून देखील बँकांमार्फत पिककर्जाचे प्रस्ताव स्वीकारले जात नसल्याचे चित्र आहे. शासनाने संबंधित बँकांना तातडीने पीककर्ज वाटपाची प्रक्रिया सुरू करण्याची सूचना संबंधित बँकांना द्यावी. 
- नंदकिशोर दाभाडे 
शेतकरी, धोपटेश्वर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers depend on crop loan