Coronavirus : संसर्ग वाढल्याने परळीत घेणार १५०० जणांचे नमुने

प्रा. प्रवीण फुटके
Friday, 10 July 2020

बॅंकेचे पाच कर्मचारी आढळले होते कोरोनाबाधित 

परळी वैजनाथ (जि. बीड) : शहरातील राणी लक्ष्मीबाई टॉवर चौकातील इंडिया बँकेचे ५ कर्मचारी शनिवारी (ता. चार) पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्य कोरोना पॉझिटिव्ह निघत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या आदेशानुसार शुक्रवारी (ता. १०) बॅंक कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या
१५०० जणांचे लाळेचे नमुने घेण्यात येणार आहेत. 

इंडिया बँकेत २५ जून ते ०४ जुलैपर्यंत व्यवहार केलेल्या ग्राहकांची यादी तयार करण्यात आली आहे. या सर्वांना होम क्वारंटाइनच्या सूचना प्रशासनाने दिलेल्या आहेत. या सर्वांचे स्वॅब घेण्यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्या उपस्थितीत येथे महसूल व आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. शहरातील ८१६ व ग्रामीण भागतील ४९५ जणांचा समावेश असून, याव्यतिरिक्त कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय व इतर १५०० नागरिकांच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी घेण्यात येत असून, शुक्रवारी (ता. १०) व शनिवारी (ता. ११) या दोन दिवसांत तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहात चार बूथ उभारण्यात आले आहेत.

हेही वाचा- कोरोनाचे सर्वच रेकॉर्ड जपून ठेवा, खंडपीठ करणार पाहणी  

यात प्रत्येक बूथमध्ये एक प्रयोगशाळा तंत्रज्ञ व एका मदतनिसाची नियुक्ती करण्यात आली आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. लक्ष्मण मोरे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिनेश कुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड १९ नियंत्रण अधिकारी म्हणून डॉ. दत्तात्रय केंद्रे, डॉ. संतोष गुंजकर, डॉ. व्यकंटेश तिडके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हेही वाचा- आमदार कुचे यांच्यासह भाऊ, युवतीविरोधात गुन्हा दाखल, युवतीकरवी भाच्यालाच पाठविले अश्लिल संदेश 

मुख्याधिकारी डॉ. अरविंद मुंडे, कार्यालयीन अधीक्षक संतोष रोडे हे समन्वयाचे काम करीत आहेत. तर ग्रामीण भागातील नागरिकांशी संपर्क साधण्याचे काम पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय केंद्रे, ग्रामसेवक करीत आहेत.  दरम्यान, कोरोनाची लक्षणे दिसणाऱ्या नागरिकांनी संपर्क साधावा, असे आवाहन उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिनेश कुरमे यांनी केले आहे. 

(संपादन : विकास देशमुख) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona test of 1500 people in Parali Beed District