जालन्यात होणार कोरोना चाचण्या 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 जून 2020

आयसीएमआरच्या निर्देशानुसार प्रयोगशाळेची निर्मिती केली जाणार असून लागणारी यंत्रसामग्री, मनुष्यबळाची उपलब्धता करून देण्यात येत आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाणार आहे, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कळविले आहे. 

जालना - कोरोना चाचण्यांसाठी जालना येथे जिल्हा रुग्णालयात आरटी-पीसीआर प्रयोगशाळा सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात जालना येथे कोरोना चाचण्यांची सुविधा निर्माण होणार आहे. राज्याचे आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत पुढाकार घेतला. 

जालना येथील रुग्णांचे नमुने औरंगाबाद येथे तपासणीसाठी पाठवावे लागतात. जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा वाढता प्रादर्भाव लक्षात घेता आणि औरंगाबाद येथील प्रयोगशाळेवरील ताण पाहता जालना येथे प्रयोगशाळा होणे गरजेचे होते. त्यामुळे श्री. टोपे यांनी याबाबत पाठपुरावा केला.

हेही वाचा : जालन्यात कोरोनाचा दुसरा बळी

या प्रयोगशाळेसाठी अंदाजित खर्च सुमारे एक कोटी रुपयांच्या आसपास असून त्याला मान्यता मिळाल्याने प्रयोगशाळा उभारणीस वेग येईल. आयसीएमआरच्या निर्देशानुसार प्रयोगशाळेची निर्मिती केली जाणार असून लागणारी यंत्रसामग्री, मनुष्यबळाची उपलब्धता करून देण्यात येत आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाणार आहे, असे पालकमंत्री टोपे यांनी कळविले आहे. 

हेही वाचा : अख्खा जेसीबीच विहिरीत गुडूप

जालना जिल्ह्यात आरटी-पीसीआर प्रयोगशाळा सुरू होणार असल्याने कोरोना रुग्णांच्या नमुन्यांचे अहवाल तातडीने मिळणार आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांना तातडीने उपचार देखील मिळण्यास मोठी मदत होणार आहे. याप्रयोगशाळेमुळे भविष्यातही स्वाईन फ्लू, डेंगीसारख्या विषाणूसंसर्ग आजारांच्या चाचण्या करण्यासाठी मदत होणार असल्याने जालना जिल्हावासीयांसाठी दिलासा देणारी बाब ठरणार असल्याचे पालकमंत्री टोपे यांनी स्पष्ट केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona testing in Jalna