अख्खा जेसीबीच विहिरीत गुडूप

लक्ष्मीकांत कुलकर्णी 
Saturday, 30 May 2020

भराव भरताना एक अख्खा जेसीबीच विहीरीत पडला. चालक कसाबसा इतरांच्या मदतीने बाहेर पडला. मात्र भराव ढासळून विहीर बुजून गेली, अख्खा जेसीबीही विहीरीत गुडूप झाला. 

कुंभार पिंपळगाव (जि.जालना) - घनसावंगी तालुक्यातील विरेगव्हाण येथे एका शेतात शनिवारी (ता.३०) भराव भरताना एक अख्खा जेसीबीच विहीरीत पडला. चालक कसाबसा इतरांच्या मदतीने बाहेर पडला. मात्र भराव ढासळून विहीर बुजून गेली, अख्खा जेसीबीही विहीरीत गुडूप झाला. 

विरेगव्हाण गावाजवळ तांड्यातील शेतकरी शिवाजी राठोड यांच्यासह चौघा भावांची शेतजमीन आहे. या शेतात ५५ फुट जुनी विहिर आहे. चौघांनी मिळुन या सामाईक विहिरीचे बांधकाम केले. विहिरीवर नविन सिमेंटचे कडे टाकण्याचे काम सुरु होते. तयार झालेल्या कड्याच्या बाजुनी माती, पाणी टाकुन भराव दाबण्याचे काम शुक्रवारी(ता.२९) रात्रीपासुन कुंभार पिंपळगाव येथील संभाजी राऊत यांच्या मालकीच्या जेसीबी यंत्राने सुरू होते.

हेही वाचा : खाचखळगे पार करीत गुंजचे गोदापात्र जलमय

शनिवारी दुपारी बारा वाजेदरम्यान काम पूर्ण होत असताना शेवटचे मातीचे खोरे टाकत असताना विहिरीचे कडे तुटले. भराव ढासाळायला सुरूवात झाली. कड्याचे बांधकाम करणारे चारजण विहिरीजवळुन बाजुला पळाल्याने वाचले. मात्र जेसीबी यंत्र हळुहळु विहिरीकडे ओढल्या जावु लागले. चालक शाम पावडे याने जेसीबी थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र ओली माती, ताजे झालेले कड्याचे सिमेंट काम यामुळे जेसीबी थेट विहिरीत गेला.

 हेही वाचा : पीककर्जावर शेतकऱ्यांची मदार

जेसीबी विहिरीत जात असताना चालक शाम पावडे याने जेसीबीचे दार उघडले आणि बाहेर उडी घेतली. तो पोहु लागला मात्र त्याच्या अंगावर सिमेंटचे कडे आणि मातीचा भराव पडत असल्याने तो दोन वेळेला पाण्यात बुडाला. त्यानंतर कसाबसा पुन्हा वर आला. विहिरीच्या जवळ असलेल्या लोकांना काय झाले कळेनासे झाले. त्यातच जेसीबीही विहिरीत दिसेनासा झाला. तेवढ्यात काही लोकांनी इलेक्‍ट्रीक मोटारचे वायर तोडले आणि विहिरीत फेकले. या वायरला धरून चालक शाम हा अनेक अडथडे दुर करून सुखरूप वर आला. बाजुचा भराव ढासळत राहिल्याने विहिर पूर्ण बुजुन गेली होती. दरम्यान, चालकाला किरकोळ मार लागला,त्याला उपचारासाठी दवाखाण्यात नेण्यात आले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jcb fell into the well in Jalna district