कोरोनादूत जाणार अडीच कोटी कुटुंबांपर्यंत, संशयित रुग्णांचा घेणार शोध

हरी तुगावकर
Monday, 14 September 2020

कोरोना आटोक्यात आणण्यासाठी शासनातर्फे राज्यभरात `माझे कुटुंब माझी जबाबदारी` ही मोहीम राबवली जाणार आहे. मोहिमेअंतर्गत राज्यातील आरोग्य कर्मचारी अडीच कोटी कुटुंबांना भेट देणार आहेत.

लातूर : कोरोना आटोक्यात आणण्यासाठी शासनातर्फे राज्यभरात `माझे कुटुंब माझी जबाबदारी` ही मोहीम राबवली जाणार आहे. मोहिमेअंतर्गत राज्यातील आरोग्य कर्मचारी अडीच कोटी कुटुंबांना भेट देणार आहेत. यातून सुमारे साडेबारा कोटी नागरिकांपर्यंत पोचण्याचा शासनाचा मानस आहे. यात आरोग्य शिक्षणासोबतच कोविड रुग्णांचा शोध घेतला जाणार आहे.

माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर कोरोना पॉझिटिव्ह, फेसबुकवर दिली माहिती

राज्यात सध्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यासाठी ट्रेस, ट्रॅक आणि ट्रीट या त्रिसूत्रीचा अवलंब केला जात आहे. असे असूनही राज्यातील रुग्णांची संख्या लक्षणीय वाढत आहे. मुंबई, पुणे यासारख्या मोठ्या शहरांसोबत ग्रामीण भागातही कोरोनाने कहर केला आहे. त्यात आता अनलॉक प्रक्रिया सुरू झाली आहे.

जनजीवन पूर्वपदावर आणण्यासोबतच कोरोनावर नियंत्रण मिळवणे तितकेच गरजेचे आहे. हे लक्षात आल्यानंतर ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. राज्यातील सर्व लोकसंख्येला दोन वेळा घर भेटी देऊन आरोग्य शिक्षण, आरोग्य संदेश, संशयित कोविड रुग्ण शोधणे तसेच मधुमेह, हृदयविकार, किडनी आजार, लठ्ठपणा यासारख्या व्यक्तींचा अंदाज घेणे, बालकांचे लसीकरण, गरोदर मातांवर वेळीच उपचार आदी या मोहिमेची उद्दिष्टे आहेत.

शेतकरी आत्महत्याबाबत उदासीनता का? बँकांकडून २५ टक्केही कर्जपुरवठा नाही

तीस कोटींचा खर्च
प्रत्येक कुटुंबात चार ते पाच सदस्य असल्याचे गृहीत धरून राज्यातील सुमारे साडेबारा कोटी नागरिकांसाठी सव्वादोन ते अडीच कोटी घरांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. वाडी, तांड्यापासून मोठ्या शहरांपर्यंतच्या नागरिकांची तपासणी केली जाणार आहे. १५ सप्टेंबर ते २५ ऑक्टोबरदरम्यान, ही मोहीम राज्यभर राबवली जाणार आहे. १५ सप्टेंबर ते दहा ऑक्टोबर मोहिमेची पहिली तर १४ ते २४ ऑक्टोबरदरम्यान दुसरी फेरी असेल. मोहिमेवर शासन तीस कोटी रुपये खर्च करणार आहे.

 

कोरोनादूत करणार सर्वेक्षण
नागरिकांच्या सर्वेक्षणासाठी पथके नियुक्त केली जातील. त्यात एक आरोग्य कर्मचारी, दोन स्थानिक स्वयंसेवक असतील. या सदस्यांना कोरोनादूत संबोधले जाईल. पाच ते दहा पथकांमागे एक वैद्यकीय अधिकारी असेल. प्रत्येक कुटुंबाची माहिती एका अॅपवर भरली जाणार आहे. या मोहिमेसाठी लोकप्रतिनिधी, राजकीय पक्ष, स्वयंसेवी संस्था, नगरसेवक, सरपंच यांचाही सहभाग घेतला जाणार आहे. जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायतीचा यात सहभाग असेल.

मोहिमेची उद्दिष्टे
- गृहभेटीद्वारे संशयित कोविड रुग्णांची तपासणी, उपचार
-अतिजोखमीचे व्यक्ती ओळखून उपचार, आरोग्य शिक्षण
-सारी, इली रुग्णांचेही सर्वेक्षण
- प्रत्येक नागरिकाचे कोविडबाबत आरोग्य शिक्षण
 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronadhoot Will Reach Two Million Fifty Lakh People