त्यांनी केले सोळा कोरोनाबाधित मृतदेहावर अंत्यसंस्कार

अविनाश काळे
Thursday, 6 August 2020

उमरगा शहर व तालुक्यात कोरोना संसर्गाचा विळखा घट्ट होतोय. विषाणूची पकड शरीरात भिनल्याने जेष्ठांना त्याचा त्रास अधिक होतो, त्यात उपचार करूनही यश मिळत नसल्याने मृत्यूला सामोरे जावे लागते. मे महिन्यात बेडग्याच्या एका जेष्ठ नागरिकाचा येथील कोविड रूग्णालयात मृत्यू झाला, त्याची दफनविधी करण्यास स्थानिकांनी विरोध केल्याने बेडगा गावी दफनविधी करावी लागली. त्यानंतर बाधित व्यक्तीच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी पालिकेकडे देण्यात आली.

उमरगा (उस्मानाबाद) : उमरगा शहर व तालुक्यात गेल्या चाळीस दिवसात कोरोना संसर्ग वाढत चालला आहे. बाधितांची संख्येने ४६५ चा आकडा ओलांडला आहे. त्यात पंधरा बाधित व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. कोविडच्या नियमावलीप्रमाणे पालिकेच्या सफाई कामगारांनी आत्तापर्यंत पंधरा बाधित व एक संशयित अशा सोळा व्यक्तींवर अंत्यसंस्कार केले आहेत. दरम्यान संसर्गाच्या भितीने कोणतेही नातेवाईक जवळ जात नसल्याने पालिकेच्या कामगारांनी जोखीम पत्करून अंत्यसंस्काराचे सोपस्कार पूर्ण केले. 

उमरगा शहर व तालुक्यात कोरोना संसर्गाचा विळखा घट्ट होतोय. विषाणूची पकड शरीरात भिनल्याने जेष्ठांना त्याचा त्रास अधिक होतो, त्यात उपचार करूनही यश मिळत नसल्याने मृत्यूला सामोरे जावे लागते. मे महिन्यात बेडग्याच्या एका जेष्ठ नागरिकाचा येथील कोविड रूग्णालयात मृत्यू झाला, त्याची दफनविधी करण्यास स्थानिकांनी विरोध केल्याने बेडगा गावी दफनविधी करावी लागली. त्यानंतर बाधित व्यक्तीच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी पालिकेकडे देण्यात आली. कोविड रुग्णालयाचे पत्र प्राप्त होताच मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर आरोग्य विभागाला अंत्यसंस्कारासाठी तयार रहाण्याच्या सूचना देतात.

आरोग्य निरीक्षक एम.आर. शेख कामगारांसाठी पीपीई किट्स आणि अंत्यसंस्कारासाठी आवश्यक ते साहित्याची जोडणी करून देतात. राजू सौंदर्गे, शाहूराज कांबळे, धनराज सुरवसे, संतोष कांबळे, दगडू माने हे कामगार मृतदेहावर अंत्यसंस्कार करतात. मोठ्या जोखीमेतून या कामगारांना हा विधी पार पाडावा लागतो. स्वॅबच्या तपासणीत दोन कामगारांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, त्यांना उपचाराला सामोरे जावे लागले. कठीण काळात कामगारच मृत व्यक्तीचे नातेवाईक होऊन काम करताहेत, खरोखरच त्यांच्या कामाचे कौतुक व्हायला हवे.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronas dead were cremated by municipal cleaners