माणुसकीची परीक्षा - कोरोनाच्या संशयाने मुलाचा अंत्यविधी रोखला

प्रकाश पाटील
Tuesday, 24 March 2020

हृदयविकाराच्या धक्क्याने सोमवारी मुलाचे निधन झाले. मात्र, ग्रामस्थांत कोरोनाच्या भीतीने अस्वस्थता पसरली. ग्रामस्थांनी त्याच्या अंत्यसंस्कारासाठी विरोध दर्शवला.

किल्लेधारूर (जि. बीड) -तालुक्यातील कासारी येथे एका सहा वर्षीय मुलाचा अंत्यसंस्कार ग्रामस्थांनी कोरोना संशयित समजून रोखल्याची मंगळवारी (ता. २४) उघडकीस आली. आरोग्य प्रशासनाने याबाबत ग्रामस्थांची समजूत काढल्यानंतर सदरील मुलावर अंत्यविधी करण्यात आला.

कासारी येथील एका मुलाला हृदयविकार होता. मुंबई येथील जे. जे. रुग्णालयात एक महिन्यापासून त्याच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान हृदयविकाराच्या धक्क्याने सोमवारी या मुलाचे निधन झाले. निधनानंतर त्याच्यावर कासारी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. मात्र, ग्रामस्थांत कोरोनाच्या भीतीने अस्वस्थता पसरली. ग्रामस्थांनी त्याच्या अंत्यसंस्कारासाठी विरोध दर्शवला.

हेही वाचा - कोरोनात हे करा-शिळे अन्न खाऊ नका, फक्त ताजे अन शिजविलेले खा

याबाबत ग्रामसेविका अनुचंदना थोरात यांनी प्रशासनास याबाबत माहिती दिली. आरोग्य विभागातर्फे भोगलवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मारुती लगड यांनी कासारी येथे जाऊन ग्रामस्थांची समजूत काढली. यानंतर यृत मुलावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona's suspicion prevented the child's funeral