कोरोनात हे करा - शिळे अन्न खाऊ नका, फक्त ताजे अन् शिजविलेले खा

योगेश सारंगधर
Tuesday, 24 March 2020

तंदुरुस्तीसाठी काय खावे?

  • क जीवनसत्व असलेली फळे खावीत
  • शिजविलेले अन्न खाण्यावर भर द्यावा
  • आवळा कँडी, मुरब्बा खाणे आरोग्यदायी
  • संत्रा, मोसंबी, लिंबूच्या रसाचे ग्रहण करावे
  • शिळे अन्न अजिबात खाऊ नये

औरंगाबाद : सध्या सगळीकडे 'कोरोना'चा कहर सुरू आहे. शहर आणि जिल्ह्यातील बाजारपेठांसह रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी सन्नाटा पसरला आहे. गावागावांत ग्रामपंचायतीमार्फत दवंडी पिटवून कोरोनाबाबत काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिक खाण्या-पिण्यावर विशेष लक्ष देत आहेत. मात्र, कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता सोशल मीडियातून अफवाही पसरवल्या जात आहे.

विशेषतः नागरिक सध्या आहाराबाबत खूपच जागरूक झाले आहेत. काही जण प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी वेगवेगळे प्रयोगही करत आहेत; मात्र कोरोनाला न घाबरता शक्यतो शिजविलेले व ताजे अन्न खाण्यावर भर देण्याचा सल्ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केमिकल टेक्नॉलॉजी विभागातील अन्नतंत्र विषयाचे प्रा. डॉ. भगवान साखळे यांनी दिला आहे.

हेही वाचा - साखरपुड्यात विवाह उरकून एक लाख दिले मुख्यमंत्री निधीत

आरोग्य विभागासह सर्वच यंत्रणा कोरोनाबाबत जनजागृती करीत आहेत. कोरोनाच्या महाभयानक संक्रमण काळात आरोग्याची काय काळजी घ्यावी, काय खावे व काय नको, याबाबत बरेचजण अनभिज्ञ आहेत. याबाबत अन्नतंत्रज्ञ डॉ. साखळे म्हणाले, की मांस, मटन, चिकन, मासे, अंडी खाल्ल्यामुळे कोरोना विषाणूचा प्रसार होत नाही. अशा काळात शक्यतो शाकाहार उत्तम असून, आहारात विविध फळांसह फळभाज्या आणि पालेभाज्यांचा समावेश करावा. शिळे अन्न अजिबात खाऊ नये. खबरदारी म्हणून वेळोवेळी सॅनिटायझर किंवा साबणाने हात स्वच्छ धुवून घ्यावेत.

हेही वाचा - परळीतील ज्योतिर्लिंग वैद्यनाथ मंदिर 31 मार्चपर्यंत बंद

डॉ. साखळे पुढे म्हणाले, की वैयक्तिक स्वच्छता किंवा सॅनिटायझर वापरावर भर द्यावा. मास्क वापरणाऱ्या विक्रेत्यांकडूनच फळभाज्या, पालेभाज्या, अन्नपदार्थ विकत घ्यावेत. अन्न बनविणाऱ्या व्यक्तीनेदेखील सुरक्षेची काळजी घेणे आवश्यक आहे. स्वयंपाक तयार करण्याची जागा किचन स्वच्छ ठेवावे, स्वयंपाक तयार करण्यासाठी उपयोगी पडणारे साहित्यही स्वच्छ पाण्याने धुवून वापरावेत, शिळे अन्न न खाता गरमागरम, चांगले शिजविलेले अन्न खाण्यावर भर द्यावा. आहारात जीवनसत्व क असलेली फळे खावीत. आवळा कँडी, मुरब्बा, संत्रा, मोसंबी, लिंबू, इतर फळांचे रस घ्यावेत, यामुळे प्रतिकारशक्ती  वाढण्यास मदत होईल.


    स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
    Web Title: Don't eat stale food, just eat fresh and cooked food