coronavirus : जालन्यात अजून दोघांना बाधा, तिघे कोरोनामुक्त

सकाळ वृत्तसेवा
Monday, 1 June 2020

जिल्ह्यात बाधितांची संख्या पोचली १२८ वर 

जालना  : कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असलेल्या कोरोनाबाधितांपैकी तीन रुग्णांचा अहवाल दुसऱ्यांदा निगेटिव्ह प्राप्त झाल्याने त्यांना सोमवारी (ता. एक) घरी सोडण्यात  आले. तर जिल्ह्यात दोन व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत १२८ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी एक रुग्ण अत्यावश्यक स्थितीत रुग्णालयात दाखल झाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात डॉक्टरांना दिवसेंदिवस यश मिळत असून, आतापर्यंत ४९ रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे. 

सोमवारी पॉझिटिव्ह आलेल्या दोन रुग्णांमध्ये जालना शहरातील मोदीखाना भागातील ३६ वर्षीय महिला व अंबडमधील २१ वर्षीय महिलेचा समावेश असून, तिला औरंगाबाद येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. बरे झालेल्या रुग्णांमध्ये नवीन जालना भागातील खासगी हॉस्पिटलमधील एक कर्मचारी, पुष्पकनगरमधील एक व मानेगाव (ता. जालना) येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. सोमवारी दोन नवीन रुग्ण आढळून आल्यानंतर एकूण बाधितांची संख्या १२८ झाली असून, सध्या रुग्णालयात ७८ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. 
 

मोदीखाना सील 

नवीन जालना भागातील मोदीखाना भागातील एक महिला कोरोनाबाधित आढळल्यानंतर जिल्हा प्रशासनाने हा परिसर कंटेनमेंट झोन जाहीर केला. पोलिसांनी हा संपूर्ण परिसर सील केला आहे. सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय देशमुख यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 
  

बॉलिवूडच्या या पिता-पुत्रीचे आहे अहल्याबाई होळकरांशी नाते, जाणून घ्या... 

३७१ व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण 

कोरोनाविषाणुचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात एकूण ३७१ व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले. यामध्ये जालना शहरातील संत रामदास हॉस्टेलमध्ये ३६, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेलमध्ये तीन, शासकीय निवासी वसतिगृहात २४, मोतीबाग येथील शासकीय मुलींच्या वसतिगृहात २१, पोलिस प्रशिक्षण केंद्रात ११० व्यक्तीचे अलगीकरण करण्यात आले आहे. 

परतूरमधील मॉडेल स्कूलमध्ये २७, जाफराबाद येथील जिजाऊ इंग्लिश स्कूलमध्ये १४, अंबड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेलमध्ये १९, शासकीय मुलींच्या वसतिगृहात २७, घनसावंगीमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेलमध्ये आठ, अल्पसंख्यांक गर्ल्स हॉस्टेलमध्ये ३६ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर इमारत क्रमांक एकमध्ये दोन व्यक्ती अलगीकरणात आहेत. मंठा येथील मॉडेल स्कूलमध्ये ३४ तर बदनापूर येथील शासकीय मुलांच्या वसतिगृहात १० व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे. 
 
जालना कोरोना मीटर 

  • एकूण बाधित : १२८ 
  • बरे झाले : ४९ 
  • उपचार सुरू : ७८ 
  • मृत्यू : १ 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronas two new patients In Jalna