बॉलिवूडच्या या पिता-पुत्रीचे आहे अहल्याबाई होळकरांशी नाते, जाणून घ्या...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 मे 2020

आज होळकर घराण्याचे वंशज विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. पण, बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध पिता-पुत्रीही होळकर घराण्याशी संबंधित आहेत. त्यांची खास माहिती eSakal.com च्या वाचकांसाठी.

औरंगाबाद - पुण्यश्लोक, कर्मयोगिनी लोकमाता अहल्याबाई होळकर यांची आज (ता. ३१ मे) जयंती. अहल्याबाई या होळकरांची बाणेदार सून, स्वाभिमानी राज्यकर्ती म्हणून त्या जगल्या. अशा या संतत्व वृत्तीच्या लोकमातेने मालव्याच्या प्रांतावर तब्बल २८ वर्षे लोककल्याणकारी राज्य केले. एक कुशल प्रशासक म्हणून त्यांची ख्याती आहे. आज होळकर घराण्याचे वंशज विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. पण, बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध पिता-पुत्रीही होळकर घराण्याशी संबंधित आहेत. त्यांची खास माहिती eSakal.com च्या वाचकांसाठी.

 
कोण आहेत ते पिता-पुत्री?

विजयेंद्र घाटगे आणि सागरिका घाटगे हे त्या पिता-पुत्रीचे नाव आहे. घाटगे कुटुंब राजघराणे आहे. सागरिकाची आजी म्हणजे विजयेंद्र यांच्या आई सीताराजे घाटगे या इंदूरचे महाराजा तुकोजीराव होळकर यांच्या तृतीय कन्या होत. तुकोजीराव होळकर हे पुण्यश्लोक अहल्याबाई होळकर यांचे थेट वंशज आहेत. दोन वर्षांपूर्वी सागरिकाने क्रिकेटपट्टू झहीर खानसोबत लग्न केले.

सतत ऑनलाइन असाल तर सावधान! जडताहेत हे आजार...

 
कोण आहेत विजयेंद्र घाटगे? 

सागरिकाचे वडील विजयेंद्र घाटगे यांनीही अनेक हिंदी चित्रपटांत भूमिका साकारलेल्या आहेत. ‘प्रेमरोग’, ‘देवदास’, ‘चितचोर’ यांसारख्या चित्रपटांत ते झळकले होते. वर्ष १९८६ मध्ये दूरदर्शनवर आलेल्या ‘बुनियाद’ मालिकेत त्यांना लाला ब्रिजभानपासून लोकप्रियता मिळाली. त्यानंतर त्यांनी अनेक मालिका आणि चित्रपटात काम केले. विजयेंद्र यांनी वाणिज्य शाखेतून पदवी घेतली. नंतर एफआयटीआयमधून अभिनयाचे धडेही घेतले. वर्ष १९७६ मध्ये ‘चितचोर’ या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये एंट्री केली. हा चित्रपट सुपरहिट ठरला. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांत भूमिका केल्या आहेत. 
 

होळकर घराण्याचा इतिहास

मराठी विश्वकोशात असलेल्या माहितीनुसार, ‘होळकर घराण्याने उत्तरेकडे राज्य विस्तार करून मध्य प्रदेशात स्वतंत्र संस्थान स्थापन केले. त्यांचा मूळ पुरुष खंडुजी हे धनगर जातीचे असून, ते शेतकरी होते. त्यांच्याकडे चौगुला वतन होते. प्रथम हे घराणे वडगाव (ता. खेड) येथे राहत होते.

नीरा नदीच्या काठी होळ मुरूम येथे मालिबा नावाचे एक मराठा धनगर होऊन गेले. त्यांच्या अकराव्या पिढीतील खंडुजी वा खंडोजी यांचे पुत्र मल्हारराव (१६९३–१७६६) यांनाच होळकर घराणे नावारूपास आणण्याचे श्रेय द्यावे लागेल. १७२५ मध्ये पहिल्या बाजीरावांनी त्यांना पाचशे स्वारांचा मुख्य नेमून माळव्यातील चौथवसुलीचे अधिकार दिले व माळवा प्रांताचा सुभेदार नेमले (१७३०). मल्हाररावांनी राणोजी शिंदे व उदाजी पवार यांबरोबर मराठी साम्राज्याच्या रक्षणासाठी व वृद्धीसाठी १७६६ पर्यंत अपरंपार कष्ट केले. उत्कृष्ट युद्धनेतृत्व व उत्तम राज्यव्यवस्था ह्यांमुळे बाणेदार व निधड्या छातीचे मल्हारराव हे धामधुमीच्या काळात मराठ्यांचे ज्येष्ठ व श्रेष्ठ सुभेदार ठरले.’  

Admission अकरावी प्रवेशप्रक्रियेसाठी अॅप..


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sagarika Gatge Hails From This Royal Family Aurangabad News