दिलासादायक...! लातुरात होणार 'कोरोना'साठी स्वतंत्र हॉस्पिटल

सुशांत सांगवे
Saturday, 28 March 2020

गेल्या काही वर्षांपासून सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे बांधकाम सुरू होते. ते जवळजवळ पूर्ण होत आले आहे. याचे लवकरच उद्घाटन केले जाणार आहे, अशी घोषणा काही महिन्यांपूर्वी पालकमंत्री अमित देशमुख यांनी एका जाहीर कार्यक्रमात केली होती. पण, आता उद्घाटनआधीच गांधी चौकातील हे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल कोरोना हॉस्पिटल म्हणून पुढे आणले जाणार आहे.

लातूर : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूने अद्याप लातुरात शिरकाव केला नाही. असे असले तरी 'कोरोना"चा मुकाबला करण्यासाठी लातुरातील प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. गांधी चौकात नव्याने उभारण्यात आलेल्या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे कोरोना हॉस्पिटलमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने पावलेही टाकली आहेत.

गेल्या काही वर्षांपासून सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे बांधकाम सुरू होते. ते जवळजवळ पूर्ण होत आले आहे. याचे लवकरच उद्घाटन केले जाणार आहे, अशी घोषणा काही महिन्यांपूर्वी पालकमंत्री अमित देशमुख यांनी एका जाहीर कार्यक्रमात केली होती. पण, आता उद्घाटनआधीच गांधी चौकातील हे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल कोरोना हॉस्पिटल म्हणून पुढे आणले जाणार आहे. त्यामुळे या हॉस्पिटलमध्ये स्वच्छतेची आणि इतर कामे सुरू केली जात आहेत. याबाबतची माहिती जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी 'फेसबुक'च्या माध्यमातून दिली. आता या हॉस्पिटलमध्ये किती रुग्णांची सोय होणार, व्हेंटिलेटर किती असणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा  

शहरातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत शुक्रवारी (ता. 27) सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत एकुण 93 व्यक्तींची तपासणी करण्यात आली असुन आजपर्यंत एकुण 2 हजार 543 रुग्णांची तपासणी करण्यात झाली आहे. त्यापैकी 50 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पुण्यातील राष्ट्रीय विषाणु संस्थेकडे पाठविण्यात आले होते.

त्यापैकी 43 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आलेले असुन 7 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहेत. त्यापैकी पाच व्यक्तीची अहवाल प्राप्त होईपर्यंत त्यांना या संस्थेच्या विलगीकरण कक्षामध्ये दाखल करण्यात आले आहे व इतर दोन व्यक्तींना खासगी रुग्णालयाच्या वर्गीकरण कक्षामध्ये दाखल करण्यात आले आहे. आजपर्यंत एकूण ९ व्यक्तींचा क्वारंटाइन कालावधी संपला आहे व इतर 34 व्यक्तींना जिल्हा आरोग्य विभागामार्फत होम क्वारंटाइनमध्ये निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.

असा आहे इतिहास

गांधी चौकातील या जागेवर आधी कस्तुरबा स्मारक प्रसूतिगृहाची उभारणी करण्यात आली होती. शहरातील व्यापारी बंधूनी ही वास्तू बांधून दिली होती. याचे उदघाटन तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते 1952 मध्ये झाले होते. त्यानंतर काही वर्षांनी कस्तुरबा गांधी जिल्हा स्त्री रुग्णालय म्हणून ते ओळखले जाऊ लागले.

बँका राहणार आठ दिवस बंद, वाचा कोणते...

काँग्रेसचे दिवंगत नेते, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी 2012 मध्ये केंद्र सरकारकडून सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल योजनेची मंजुरी मिळवून दिली. त्यांनतर जुनी इमारत पडून नव्या इमारतीचे बांधकाम सुरू झाले. सध्या बांधकाम जवळजवळ पूर्ण झाले आहे. स्वच्छता, वीज पुरवठा याची कामे बाकी आहेत. ती युद्धपातळीवर पूर्ण केली जात आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CoronaVirus Covid-19 Hospital In Latur Maharashtra