मुरूडकरांना खुशखबर... `त्या` युवकाचा अहवाल निगेटिव्ह

विकास गाढवे
रविवार, 22 मार्च 2020

फ्रान्सला गेलेला हा युवक चार दिवसापूर्वी घरी परतला. तो घरीच नातेवाईकासह कोणाच्याही संपर्कात न येता स्वतःहून होम क्वारंटाईनमध्ये थांबला होता. याची माहिती पोलिस व आरोग्य यंत्रणेला नव्हती. मुरूडमध्ये मात्र, तो कोरोनाबाधीत असल्याची चर्चा घडून आली. यातूनच या युवकावर तपासणीसाठी दबाव वाढला.

लातूर : फ्रान्सवरून आलेल्या मुरूड (ता. लातूर) येथील `त्या` युवकाचा कोरोना विषाणूबाबतचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. मुरूडच्या ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एल. एस. देशमुख यांनी रविवारी (ता. २२) सकाळी ही माहिती दिली. फ्रान्सवरून आलेला हा युवक स्वतःच्या घरीच होम क्वारंटाईनमध्ये थांबला होता.  ग्रामस्थांच्या भीतीनंतर  त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

फ्रान्सला गेलेला हा युवक चार दिवसापूर्वी घरी परतला. तो घरीच नातेवाईकासह कोणाच्याही संपर्कात न येता स्वतःहून होम क्वारंटाईनमध्ये थांबला होता. याची माहिती पोलिस व आरोग्य यंत्रणेला नव्हती. मुरूडमध्ये मात्र, तो कोरोनाबाधीत असल्याची चर्चा घडून आली.

यातूनच या युवकावर तपासणीसाठी दबाव वाढला. काही ग्रामस्थांनी वरिष्ठ शासकीय  यंत्रणेकडे ऑनलाईन तक्रारी केल्या. यामुळे आरोग्य विभागानेही या युवकाला रूग्णालयात आणण्यासाठी गुरूवारी (ता. १९) रात्री घरी रूग्णवाहिका पाठवली. मात्र, युवकाने येण्यास नकार दिला.

चिंताजनक... राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ६४ वरून ७४ वर

यंत्रणेने पोलिसांची मदत घेण्याची तयारी सुरू केली असतानाच युवक स्वतःहून ग्रामीण रूग्णालयात दाखल झाला. त्याला कोणतेही लक्षणे आढळून आली नाहीत. मात्र, घशात त्रास होत असल्याचे सांगितल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून  येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत करण्यात आले.

संस्थेत त्याच्या घशातील द्रावाचा नमुना (स्वॅब) घेऊन पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेकडे पाठवला व युवकाला मुरूडच्या ग्रामीण रूग्णालयातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. 

रविवारी सकाळी प्रयोगशाळेकडून अहवाल निगेटिव्ह आला. यामुळे युवकाला घरी पाठवण्यात येणार असून त्याला घरी थांबण्याचा म्हणजेच होम क्वारंटाईनचा  सल्ला देण्यात येणार असल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले. अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर मुरूडकरांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CoronaVirus Covid-19 Patient Negative In Latur Maharashtra