कोरोनाचा भूकंप निलंग्यात : हादरे मात्र उदगीरला

युवराज धोतरे 
Sunday, 5 April 2020

कोरोनाचा भूकंप झाला निलंग्यात... मात्र हादरे उदगीरला बसत असून, शेजारचाच तालुका असल्याने उदगीरकरांचीही झोप उडाली आहे. नागरिकांबरोबरच महसूल प्रशासन, आरोग्य विभाग व पोलीस प्रशासन अलर्ट झाले आहे.

उदगीर : कोरोनाचा भूकंप झाला निलंग्यात... मात्र हादरे उदगीरला बसत असून, शेजारचाच तालुका असल्याने उदगीरकरांचीही झोप उडाली आहे. नागरिकांबरोबरच महसूल प्रशासन, आरोग्य विभाग व पोलीस प्रशासन अलर्ट झाले आहे.

महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमा भागात वसलेल्या उदगीर शहराचा बिदर व निलंगा शहराशी सातत्याने संपर्क आहे. सध्या लाॅकडाऊन असले, तरी नागरिकांची अत्यावश्यक कारणासाठी निलंगा-उदगीर ये-जा सुरूच होती. मात्र निलंग्यात आठ जण कोरोना पॉझिटीव्ह निघाल्यानंतर निलंग्याच्या भूकंपाचे हादरे उदगीरकरांना बसत असल्याचे चित्र आहे.

शनिवारी (ता.4) निलंग्यात कोरोनाचा भूकंप झाल्याच्या पार्श्वभूमीवर महसूल, आरोग्य व पोलीस प्रशासन अलर्ट झाले आहेत. बाहेर देशातून व दिल्लीतून उदगीरात आलेल्या रुग्णांना पुन्हा बोलावून त्यांचे स्वॅब नमुने घेण्यासाठी लातूरला पाठवण्यात येत आले आहे. या पार्श्वभूमीच्या चार जणांना शनिवारी लातूरला पाठवण्यात आले होते. पैकी दोन जणांचे स्वॅब नमुने घेण्यात आले, तर इतरांना लक्षणे दिसत नसल्याने होम क्वारंटाईन करण्याचा सल्ला देऊन परत पाठवण्यात आल्याचे आरोग्य सूत्रांकडून सांगण्यात आले.

वैजापुरातून कोरोना संशयित गायब

उदगीर शहर व परिसरामध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र प्रशासनाच्या वतीने नागरिकांनी न भिता काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अद्यापही नागरिक गावाकडे येत असल्याने प्रशासनासह नागरिकातही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

न भिता काळजी घ्यावी...

निलंगा येथे आढळलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी भयभीत होऊ नये. निलंगा येथे जरी ते सापडले असले तरी त्यांची पार्श्वभूमी बाहेरची आहे. उदगिरातील नागरिकांनी भयभीत होऊ नये, मात्र काळजी घ्यावी. घरातच बसावे, विनाकारण गर्दीत जाणे टाळावे, अधिक काळजी घ्यावी, असे आवाहन उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CoronaVirus Covid-19 Patient Positive In Nilanga Latur Maharashtra Udgir News