ऊसतोड कामगारही कोपीवर बसून

लक्ष्मीकांत कुलकर्णी
Sunday, 22 March 2020

ऊसतोड कामगारांनीही रविवारी जनता कर्फ्युत सहभाग नोंदवला व घरीच थांबणे पसंत केले यामुळे मजुर आणि त्यांचे कुटुंब दिवसभर कोप्यात किंवा आजूबाजूच्या शेतातील झाडाखाली बसून होते. ऊसतोडीच्या बैलगाड्या घरीच होत्या,जनावरेही बांधून होती.

कुंभार पिंपळगाव (जि.जालना) - कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी रविवारी (ता.२२) जनता संचारबंदीच्या काळात ऊसतोड कामगारही कोपीवर बसून राहिले. घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव परिसरात ऊसतोडीची कामे बंद ठेवत कामगारही जनता संचारबंदीला प्रतिसाद दिला. 

कोरोना विषाणूची लागण होवु नये यासाठी विविध माध्यमातून खबरदारी घेतल्या जात आहे सर्व स्तरातील लोकांकडून जनजागृती केल्या जात आहे.कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासन पातळीवर तातडीने उपाययोजनाही सुरू आहेत.

हेही वाचा : परदेशातून आलेल्या डॉक्टरला नोटीस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जनता संचारबंदीचे आवाहन केले होते याला शहरासह ग्रामीण भागात, खेड्यापाड्यात, वाड्या वस्त्यांवर, तांड्यात, गल्लीबोळात मोठा प्रतिसाद मिळाला. लोकांनी घरात बसणे पसंत केले. परिसरात अनेक शेतात, माळरानावर,आखाड्यावर ऊसतोड कामगार राहत आहेत.कोरोनाच्या धास्तीने या कामगारांनीही रविवारी जनता कर्फ्युत सहभाग नोंदवला व घरीच थांबणे पसंत केले यामुळे मजुर आणि त्यांचे कुटुंब दिवसभर कोप्यात किंवा आजूबाजूच्या शेतातील झाडाखाली बसून होते. ऊसतोडीच्या बैलगाड्या घरीच होत्या,जनावरेही बांधून होती. 

गावात जनता संचारबंदीला मोठा प्रतिसाद 

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कुंभार पिंपळगाव येथे जीवनावश्‍यक वस्तुंची विक्री वगळता बाकी सर्व दुकाने पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत. येथे रविवारी(ता.२२)जनता संचारबंदीला मोठा प्रतिसाद मिळाला. सकाळी सहा वाजल्यापासून रस्त्यावर शुकशुकाट जाणवत होता .गावातील मुख्य रस्ते निर्मनुष्य झाले होते. पोलिस उपनिरीक्षक सचिन कापुरे, कर्मचारी रामदास केंद्रे यांच्यासह जितु शिंदे हे सकाळपासून बंदोबस्तासाठी रस्त्यावर उभे होते. त्यांच्या वाहनावर भोंगा लावून गस्त सुरू होती. सकाळी चौकात व रस्त्यांवर एका पेक्षा जास्त माणसाला उभा राहू दिल्या जात नव्हते. त्यानंतर पाहुणा मारुतीचे मंदिरही दर्शनासाठी बंद करण्यात आले. यामुळे लोकांना थेट घर गाठावे लागले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CoronaVirusNews response to public curfew by labour